दुर्मिळ छोटा चिखल्याची जिल्ह्यात नोंद
By Admin | Updated: May 25, 2015 00:27 IST2015-05-25T00:27:53+5:302015-05-25T00:27:53+5:30
पक्षी निरीक्षणादरम्यान जिल्ह्यातील मालखेड व सिंभोरा तलावावर दुर्मिळ असा छोटा चिखल्या पक्षी आढळून आल्याने ...

दुर्मिळ छोटा चिखल्याची जिल्ह्यात नोंद
पक्षी निरीक्षण : मालखेड, सिंभोरा तलावावर विहार
अमरावती : पक्षी निरीक्षणादरम्यान जिल्ह्यातील मालखेड व सिंभोरा तलावावर दुर्मिळ असा छोटा चिखल्या पक्षी आढळून आल्याने पक्षीप्रेमींमध्ये आनंद व्यक्त होत आहे. वन्यजीव छायाचित्रकार मनोज बिंड, प्रफुल्ल गावंडे आणि वन्यजीव अभ्यासक क्रिष्णा खान यांना पक्षी निरीक्षणादरम्यान अमरावती जिल्ह्यात प्रथमच छोटा चिखल्या पक्षी आढळून आला आहे.
अमरावती जिल्हा पक्ष्यांच्या वैविध्याचे दर्शन घडविणारा असून अनेक पक्षी निरीक्षक पहाटेच छत्री तलाव, वडाळी तलाव, पोहरा तलाव, मालखेड तलाव येथे पक्षी निरीक्षणासाठी जातात. शहरातील मनोज बिंड, प्रफुल्ल गावंडे या पक्षी निरीक्षकांनी मालखेड तलाव व क्रिष्णा खान यांनी सिंभोरा तलावावर पक्षी निरीक्षण केले असता २३ मे रोजी चिखल्या पक्षी आढळून आला. यापूर्वी नागपूर येथे चिखल्या पक्ष्याची नोंद झालेली आहे. या पक्ष्याला इंग्रजी भाषेत ‘लेस्सर सँड प्लोवर’ तर शास्त्रीय भाषेत ‘काराड्रीअस मंगोलस’ म्हणून ओळख आहे. हा ‘क्यार्याड्रीडी’ या कुळातील असून तो लावा किंवा बटेर पक्ष्याच्या म्हणजे १९ ते २१ से.मी. आकाराचा असतो. पाणथळ जमीन तसेच समुद्र किनारपट्टीलगत हा पक्षी आढळून येतो. त्याच्या कपाळ आणि भुवयांचा रंग पांढुरका असून चोचीखालचा रंग पूर्णत: पांढरा व पोटाखालचा रंगही पांढरा आहे. चिखल्याचे पाय आणि चोचही काळ्या रंगाची आहे. खांद्याजवळील राखी-तपकिरी रंग ही या पक्ष्याची खास ओळख आहे. जिल्ह्यात चिखल्याची नोंद झाल्यामुळे वैभव दलाल, प्र.सु. हिरुरकर, सचिन थोते, राहुल गुप्ता, सुरेश खांडेकर, सचिन सरोदे, अमिताभ ओगले, शशी ठवळी, शुभम सायंके, धनंजय भांबुरकर वन्यजीव छायाचित्रकारांनी आनंद व्यक्त केला आहे.
पहिल्यांदाच चिखल्या पक्ष्याची नोंद जिल्ह्यातील तलावावर झाली आहे. जिल्ह्यातील नैसर्गिक वातावरण पक्ष्यांसाठी समृद्ध असल्यामुळे पक्षी वैविध्य बघण्यास मिळत आहे. छायाचित्रकारांनी पक्ष्यांच्या नियमितपणे नोंदी घेतल्यास पुढील पिढीला माहिती देता येईल. तसेच संशोधन, संवर्धन व संरक्षणाची जबाबदारीही वन्यपे्रमीन्ाां कळेल.
- यादव तरटे,
वन्यजीव अभ्यासक.