स्टरनिडी कुळातील हा दुर्मिळ पक्षी : छत्री तलाव भागात आढळला, पक्षिप्रेमींमध्ये आनंदअमरावती : ‘इंटरनॅशनल युनियन कंझर्व्हेशन आॅफ नेचर’ संघटनेने संकटग्रस्त यादीत समाविष्ट ‘काळपोट्या पराटी’ पक्ष्याची नोंद अमरावती येथील छत्री तलावावर केली. दुर्मिळ असणारा हा पक्षी अमरावतीत आढळल्याने वन्यप्रेमींमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. वन्यजीव छायाचित्रकार मनोज बिंड, निसर्ग लेखक प्र.सु. हिरुरकर, वैभव दलाल, राहुल गुप्ता, धनंजय भांबुरकर, प्रफुल्ल गावंडे पाटील, सुरेश खांडेकर आणि वन्यजीव अभ्यासक यादव तरटे यांनी शहरलागतच्या छत्री तलावावर पक्षी निरीक्षण केले असताना त्यांना काळपोट्या पराटी हा पक्षी आढळून आला. ‘काळपोट्या कुररी’ किंवा ‘लहान सरोता’ या नावानेदेखील ओळखला जाणारा हा पक्षी अत्यंत दुर्मिळ समजला जातो. केरळ किनारपट्टीसह मेघालय, सिक्कीम भागात हिवाळ्यात हा स्थलांतर करीत असून महाराष्ट्र पठार, माळव्याचे पठार, छोटा नागपूर पठार, गंगा-ब्रम्हपुत्रा नदीच्या खोऱ्यात याचे दर्शन होण्याची शक्यता फार धूसर असते. त्यामुळे अमरावती येथील त्याचे दुर्मिळ दर्शन पक्षिप्रेमींना आनंद देणारे ठरले. भारतात १८ प्रकारचे ‘टर्न’ पक्षी दिसत असून त्यात गिल-बिल टर्न, रिवर टर्न, लिटिल टर्न. व्हिस्करड टर्न आणि आता ब्लॅक बेलीड टर्नच्या दर्शनामुळे अमरावती जिल्ह्यात आता ५ प्रकारच्या टर्न पक्ष्यांचे दर्शन होऊ शकते. स्टरनिडी कुळातील या पक्ष्याला शास्त्रीय भाषेत ‘स्टर्ना अॅक्युटीकॉडा’ या नावाने ओळखले जाते. इंग्रजी भाषेत याला ‘ब्लॅक बेलीड टर्न’ असेही म्हणतात. हा पक्षी आकाराने कावळ्यापेक्षा लहान असून याची चोच नारिंगी रंगाची असते. शेपूट लांब व टोकदार बाणासारखे असून शेपटी व पोटाखालचा भाग काळा असतो. डोक्याचा वरचा भाग काळा असून पंखावर पांढऱ्या रेषा असतात. गाल आणि गळा पांढऱ्या रंगाचा असून याची पाण्यावर उडताना सूर मारून मासे पकडण्याची तऱ्हा लक्ष वेधणारी आहे. लहान सरोता पक्ष्याचे दर्शन अतिदुर्मिळ असल्यामुळे पक्षिमित्र सचिन सरोदे, क्रिष्णा खान, अमिताभ ओगले, शशी ठवळी, सचिन थोते, अंगद देशमुख व क्रांती रोकडे या वन्यजीवप्रेमींमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)
संकटग्रस्त ‘काळपोट्या पराटी’ पक्ष्याची नोंद
By admin | Updated: October 26, 2015 00:35 IST