रेकॉर्ड तपासणीचा धडाका; कंत्राटदार धास्तावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2016 00:12 IST2016-03-12T00:12:26+5:302016-03-12T00:12:26+5:30
जनसामान्यांना नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी योजनांचा महसुल वसुली मोहिमेंंतर्गत तहसीलदार पी.व्ही. वाहूरवाघ

रेकॉर्ड तपासणीचा धडाका; कंत्राटदार धास्तावले
६९ ग्रा.पं. रडारवर : तहसीलदारांची मिशन वसुली
मनोज मानतकर नांदगाव खंडे. :
जनसामान्यांना नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी योजनांचा महसुल वसुली मोहिमेंंतर्गत तहसीलदार पी.व्ही. वाहूरवाघ यांनी ६९ ग्रामपंचायतींच्या रेकॉर्ड तपासणीचा धडाका लावल्याने संबंधित कंत्राटदार धास्तावले आहेत.
मागील पाच वर्षांत ६९ ग्रामपंचायतींअंतर्गत १३१ गावांत कोट्यवधींची विकासकामे झाली आहेत. ही कामे करीत असताना अंदाजपत्रकात नमूद केलेल्या गौणखनिज वापरासंदर्भातील आकडेवारीनुसार रॉयल्टीचा भरणाचा होत नसल्याने निदर्शनात येत आहे. त्यामुळे शासनाला लाखो रुपयांचा फटका बसत असल्याने तहसीलदारांनी तालुक्यातील ग्रामपंचायत, कृषीविभाग, आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग, पंचायत समिती, जि.प. या विभागांतर्गत विकासकामांच्या अंदाजपत्रक तपासणीस प्रारंभ केला आहे. त्यासाठी एक समिती गठित करण्यात आली आहे. यामध्ये तहसीलदारांसह नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, सरपंच यांचा समावेश आहे. तालुक्यातील संपूर्ण ग्रामपंचायतींच्या सचिवांना सूचना देण्यात आल्या आहेत.
ज्या कंत्राटदारांनी ही विकासकामे केली त्यांना गौण खनिज रॉयल्टीचा भरणा करण्यासंदर्भात नोटीस देऊन आठ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. जर संबंधित कंत्राटदारांनी दिलेल्या कालावधीत रॉयल्टीचा भरणा केला नाही तर रॉयल्टी रकमेच्या पाचपट दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे कंत्राटदार धास्तावले आहेत.