चार खासगी रुग्णालयांवर कठोर कारवाईची शिफारस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 23:55 IST2021-03-08T05:00:00+5:302021-03-07T23:55:01+5:30
कोविड, नॉनकोविड रुग्णांवर खासगी रुग्णालयांमध्ये तपासणी व चाचण्यांकरिता शासनाद्वारे दर निश्चित केले. त्यानुसार रुग्णांकडून आकारणी करणे अनिवार्य आहे. आकारणी या दरपत्रकानुसारच होते की कसे, याबाबत तपासणीकरिता जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ९ सप्टेंबर रोजी जिल्हा पथक गठित केले होते. या पथकाद्वारे एमजेपीजेएवाय व पीएमजेएवाय योजनेचे कामदेखील पाहण्यात येते.

चार खासगी रुग्णालयांवर कठोर कारवाईची शिफारस
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : खासगी रुग्णांलयाद्वारे कोविड, नॉनकोविड रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी गठित जिल्हा पथकाने शनिवारी चार खासगी रुग्णालयांना आकस्मिक भेट दिली असता, अवास्तव बिलांच्या आकारणीसह अनेक नियमबाह्य प्रकार पथकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे महापालिका आयुक्तांना शनिवारी अहवाल सादर करून कठोर कारवाईची शिफारस करण्यात आली.
कोविड, नॉनकोविड रुग्णांवर खासगी रुग्णालयांमध्ये तपासणी व चाचण्यांकरिता शासनाद्वारे दर निश्चित केले. त्यानुसार रुग्णांकडून आकारणी करणे अनिवार्य आहे. आकारणी या दरपत्रकानुसारच होते की कसे, याबाबत तपासणीकरिता जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ९ सप्टेंबर रोजी जिल्हा पथक गठित केले होते. या पथकाद्वारे एमजेपीजेएवाय व पीएमजेएवाय योजनेचे कामदेखील पाहण्यात येते. उपजिल्हाधिकारी राम लंके, लेखाधिकारी नरेंद्र भटूरकर, जिल्हा समन्वयक सचिन सानप, सहायक विलास घाटे, नितीन पडकुले, राजेश शर्मा यांचा पथकात समावेश आहे. शनिवारी जिल्हा टास्क फोर्सची बैठक झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार पथकाद्वारे चार खासगी रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांच्या देयकांची नमुना तपासणी अचानक करण्यात आली. यात मोठ्या प्रमाणात त्रुटी, रुग्णांकडून अवास्तव बिलांची आकारणी व नियमबाह्य कारभार उघडकीस आला. हा अहवाल आयुक्त प्रशांत रोडे यांना शनिवारी सादर करण्यात आला. त्यात कारवाईची शिफारस करण्यात आली. आता आयुक्त कोणती कारवाई करतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
हिलटॉप हॉस्पिटल
शासन दरपत्रकाप्रमाणे सिझेरीयन सेक्शन या शस्त्रक्रियेसाठी ५३ हजार प्रतिशस्त्रक्रिया व उपचारासाठी एकरकमी दर निर्धारित केले आहे. मात्र, देयक क्रमांक १४ मध्ये ८६,६०० रुपये नमूद आहे. प्रतिदिन चार हजारांप्रमाणे सहा दिवसांसाठी २४ हजारांची आकारणी केली. दर्शनी भागात दरपत्रक लावले नाही.
रेनबो हॉस्पिटल
पीपीई किटच्या दराचा उल्लेख नसलेले जुने जोडपत्र लावलेले पथकाला दिसून आले. रुग्णांकडून ईसीजी, इन्फ्युजन, इंट्युबेशनकरिता अतिरिक्त दराची आकारणी, काही रुग्णांना आयसीमधून प्रकृती ठीक झाल्यावर आयसोलेशन वाॅर्डात दाखल केल्यानंतरही त्या दिवसांचे सरसकट आयसीयूची आकारणी करण्यात आली.
सिटी मल्टिस्पेशािलिटी हॉस्पिटल
वारंवार मागणी करूनही पथकाला बिलबूक दिले नाही. तासाभरानंतर एक बिलबूक दिले. त्यातील २२ पावत्या काढून पुरावा नष्ट केल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. सायंकाळी पथक सदस्यांच्या भ्रमणध्वनीवर कॉल करून सर्व देयकांच्या प्रिंटआऊट तयार असल्याचे सांगण्यात आल्याचे पथकाच्या अहवालात नमूद आहे.
अंबादेवी कोविड हॉस्पिटल
पीपीई कीट व औषधांचे खोके जाळून नष्ट करताना दिसून आले. याशिवाय बिलिंग सेक्शन हा उपचार करण्यात येत असलेल्या वाॅर्डातच कार्यन्वित असल्याचे पथकाला दिसून आले. रुग्णांचे नातेवाईक यांना जनरल वाॅर्डात पाणी व इतर साहित्य देण्यासाठी थेट प्रवेश असल्याचे आढळले.