डफरीनच्या वाढीव बांधकामाला मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 00:09 IST2017-11-21T00:09:44+5:302017-11-21T00:09:59+5:30

शहरातील प्रलंबित विकासकामांबाबत आ. सुनील देशमुख यांच्या विनंतीनुसार सोमवारी मंत्रालयात बैठक घेण्यात आली.

Recognition of the increase in Daphren's construction | डफरीनच्या वाढीव बांधकामाला मान्यता

डफरीनच्या वाढीव बांधकामाला मान्यता

ठळक मुद्देसुनील देशमुख यांचा पाठपुरावा : मुख्यमंत्र्यांच्या वॉररूममध्ये बैठक

आॅनलाईन लोकमत
अमरावती : शहरातील प्रलंबित विकासकामांबाबत आ. सुनील देशमुख यांच्या विनंतीनुसार सोमवारी मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या बांधकामाच्या निविदेला मंजुरी देण्यात आली. याशिवाय अन्य प्रकल्पांनाही हिरवी झेंडी देण्यात आली आहे.
अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दुपारी मुख्यमंत्र्यांच्या वॉररूममध्ये झालेल्या या बैठकीला विविध विभागाचे सचिव तथा अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशान्वये ही बैठक घेण्यात आली.
२०० खाटांच्या स्त्री रुग्णालयाच्या बांधकामाच्या निविदेस मंजुरी देण्याबाबत संबंधित विभागाच्या सचिवांना निर्देश देण्यात आले. ही निविदा शासनाकडे मार्च २०१६ पासून प्रलंबित होती. यापूर्वी विभागाने प्रस्तावात ४५ कोटी २१ लाख रुपयांची मान्यता प्रदान केली होती. बेलोरा विमानतळ महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे वर्ग करण्यासाठी विभागाने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. एटीआर ७२ प्रकारातील विमानाचे आवागमन, नाइट लँडिंग सुविधेसह धावपट्टीचा १३८५ मीटरवरून १८०० मीटर विस्तार करण्याकरिता ७५ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यासाठी या आर्थिक वर्षात सामान्य प्रशासन विभागाने १५ कोटी रुपयांचा प्रस्ताव वित्त विभागाला सादर करण्याची सूचना या निमित्ताने करण्यात आली.
चित्रा चौक ते नागपुरी गेट उड्डाणपुलाच्या निविदेत काही तांत्रिक बाबींचा समावेश करून हा विषय मार्गी लावण्याच्या सूचनासुद्धा परदेशी यांनी दिल्यात. याशिवाय भुयारी गटार योजनेच्या निविदेबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सदस्य सचिवांना वाढीव निधी देण्याबाबत सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आलेत. शहरातील फिशरीज हबबाबत मनपा व इतर खासगी यंत्रणेसोबत सामंजस्य करार करून प्रकल्प मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
सदर बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभाग सचिव सगणे, पशुसंवर्धन सचिव डबले, नगरपालिका प्रशासन संचालक संतोष कुमार, मनपा आयुक्त हेमंत पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

Web Title: Recognition of the increase in Daphren's construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.