रेवस्यात देवीच्या मूर्तीची विटंबना
By Admin | Updated: October 28, 2014 22:48 IST2014-10-28T22:48:57+5:302014-10-28T22:48:57+5:30
नजीकच्या रेवसा येथील मरीमाता देवीच्या मंदिरातील मूर्ती मंदिराबाहेर काढून ठेवल्याची घटना मंगळवारी सकाळी ६ वाजतादरम्यान उघडकीस आली. या प्रकारामुळे रेवस्यात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

रेवस्यात देवीच्या मूर्तीची विटंबना
तणाव निवळला : मंदिराबाहेर काढली देवीची मूर्ती
अमरावती : नजीकच्या रेवसा येथील मरीमाता देवीच्या मंदिरातील मूर्ती मंदिराबाहेर काढून ठेवल्याची घटना मंगळवारी सकाळी ६ वाजतादरम्यान उघडकीस आली. या प्रकारामुळे रेवस्यात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर येथील तणाव निवळला. वलगाव पोलीस मूर्तीची विटबंना करणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेत आहेत.
रेवसा परिसरात मरीमाता देवीचे देवस्थान असून मंदिरात शेंदूराने माखलेली देवीची मूर्ती आहे. दररोज शेकडो भाविक मरीमाता देवीच्या दर्शनासाठी येतात. मंदिर परिसर खुला असल्यामुळे मंदिरात कोणीही, केव्हाही ये-जा करू शकते. मंगळवारी पहाटे मंदिरात दर्शनासाठी काही गावकरी गेले असता त्यांना मंदिराच्या बाजूला असलेल्या कचऱ्यात देवीची मूर्ती पडून असल्याचे दिसून आले. या प्रकाराबद्दल गावकऱ्यांनी काही नागरिकांची चौकशी केली; मात्र चोरी झाल्याचे निदर्शनास आले नाही. काही लोकांनी वलगाव ठाणे गाठून या घटनेची सविस्तर माहिती पोलिसांनी दिली. विटंबना झाल्याच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली व गावकऱ्यांना याबाबत विचारणा केली. तेव्हा या घटनेची तक्रार गावकऱ्यांनी केली नसल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनेची नोंद पोलीस डायरीत घेतली आहे. मंदिर परिसरात तणाव निर्माण होऊ नये, याकरिता तेथे पोलिसांचा काही वेळ बंदोबस्त लावण्यात आला होता. परंतु पोलिसांनी योग्य वेळी गावात पोहोचून यशस्वी मध्यस्थी गेल्याने गावात कोणताही तणाव उद्भवला नाही. आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.