पराभूत उमेदवाराचा आरोप : सभापतिपदाच्या निवडीवर प्रश्नचिन्हअमरावती : अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनियुक्त संचालक विकास इंगोले यांच्या विरोधात पराभूत उमेदवाराने जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयात दाद मागितली आहे. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सेवा सहकारी सोयसाटी मतदारसंघातील एका जागेसाठी झालेल्या एकूण मतदानाच्या पुनर्मोजणीचे आदेश पारित केल्याच्या माहिती हाती आली आहे. १५ सप्टेंबरला अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. १६ सप्टेंबरला मतमोजणी होवून विजयी उमेदवार घोषित करण्यात आले. भातकुली तालुक्यातील सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून विकास जगन्नाथराव इंगोले यांना ३६५ मते मिळाली होती. त्यांना १७ मतांनी विजयी घोषित करण्यात आले. दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या भैय्या निर्मळ यांना ३४८ तर नीलेश मानकर यांना १९४ मते पडली होती, तर १०४ मते अवैध ठरली होती. विकास जगन्नाथ इंगोले यांना विजयी ठरविल्यानंतर मागील आठवड्यात पराभूत उमेदवार भैय्या निर्मळ यांनी निवडणूक अधिकारी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयात धाव घेतली. अवैध मतांमध्ळे आपली मते निघू शकतात, २५ मते विनाकारण अवैध ठरविण्यात आली असा आक्षेप घेत या एका जागेच्या मतांची फेरमोजणी करण्यात यावी, अशी मागणी भैय्या निर्मळ यांनी केली. त्यावर शनिवारी सुनावणी झाली. त्यावेळी विकास इंगोले यांच्याकडून बाजू मांडली गेली नाही. त्यामुळे आज अॅड. अरूण गावंडे यांच्याकडून विकास इंगोलेंची बाजू मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र शनिवारी अधिकृत तारीखेवर बाजू न मांडल्याने आज जिल्हाधिकाऱ्यांनी विकास इंगोले व भैया निर्मळ यांच्यात झालेल्या लढतीची मतांची पुनर्मोजणी करण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे. उल्लेखनीय म्हणजे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती-उपसभापती निवडण्यासाठी १३ आॅक्टोबरला निवडणूक होणार आहे. (प्रतिनिधी)
बाजार समितीमधील एका जागेच्या मतांची पुनर्मोजणी
By admin | Updated: October 6, 2015 00:28 IST