अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:16 IST2021-03-09T04:16:50+5:302021-03-09T04:16:50+5:30
वित्तमंत्री अजित पवार यांनी सोमवारी महिला दिनी महिलांसाठी विविध योजना जाहीर करून आगळीवेगळी भेट दिली आहे. या योजना केवळ ...

अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया
वित्तमंत्री अजित पवार यांनी सोमवारी महिला दिनी महिलांसाठी विविध योजना जाहीर करून आगळीवेगळी भेट दिली आहे. या योजना केवळ कागदावर असू नयेत. ग्रामीण भागातील मुलींपर्यंत त्या पोहोचल्या पाहिजे. पुरुषप्रधान समाजव्यवस्थेमध्ये ‘स्त्री’च्या नावे घर असणे ही तिच्यासाठी खूप आनंदायी बाब आहे. राज्य राखीव दलात महिलांची तुकडी राहील. यात महिलांना प्रतिनिधित्व करण्याची नक्कीच संधी आहे.
- स्मिता सतीश माळोदे, व्हीएमव्ही, अमरावती.
----------------
कोरोनाच्या सावटात राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला. विशेषत: महिला, मुलींना प्रोत्साहन देणाऱ्या योजनांचा समावेश असल्याचा आनंद आहे. गतवर्षापासून कोरोनामुळे शिक्षणाचे तीनतेरा झाले असताना, मुलींचा शिक्षणात टक्का वाढविण्यासाठी भरपूर प्रयत्न करण्यात आले आहेत. प्राथमिक, माध्यमिक शिक्षणावर भर देताना पदवीपर्यंत विद्यार्थ्यांना सुलभतेने शिक्षणाची सुविधा दिली आहे. मागासवर्गीय, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर भर आहे.
- वैशाली परतेकी, शिक्षिका, अमरावती.
----------------
अर्थसंकल्पातील तरतुदी या केवळ राजकीय घोषणा
उच्च शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी तुटपुंजी तरतूद केली आहे. येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. परंतु, त्याच्या अंमलबजावणीसाठी कोणत्याही प्रकारची तरतूद करण्यात आलेली नाही. पारंपरिक विद्यापीठांकडे शासनाने पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षण साधनसामग्री, प्रशिक्षण वर्गासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल, ही अपेक्षा फक्त अपेक्षाच राहिली आहे. प्राध्यापक भरतीकडे शासनाने कानाडोळा केलेला दिसून येतो.
- रवि रमेश दांडगे, प्रदेश मंत्री, अभाविप विदर्भ प्रदेश
------------------