पुन्हा लसीकरणाची बोंब, शहरातील सर्व केंद्रे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 05:00 IST2021-07-22T05:00:00+5:302021-07-22T05:00:56+5:30
कोरोना प्रतिबंध तसेच संसर्गाची साखळी ब्रेक करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. यामुळे समाजात सामूहिक रोग प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) तयार होऊन कोरोना संसर्गाला ब्रेक लावता येणार आहे. यासाठी जिल्ह्यात १०० वर केंद्रांद्वारे लसीकरण होत आहे. मात्र, पुरवठ्याअभावी यात सातत्य नाही. सोमवारी सायंकाळी लसींचा साठा संपुष्टात आला. त्यामुळे मंगळवारपासून लसीकरण बंद आहे.

पुन्हा लसीकरणाची बोंब, शहरातील सर्व केंद्रे बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात लसींचा स्टॉक संपल्याने मंगळवारपासून केंद्रांना टाळे लागले. अद्यापही पुरवठा नसल्याने जिल्ह्यातील १०० वर केंद्रे बंद ठेवण्याची नामुष्की आरोग्य यंत्रणेवर ओढवली आहे. लसीकरण सोमवारी सहा दिवसांनंतर सुरू होण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली.
कोरोना प्रतिबंध तसेच संसर्गाची साखळी ब्रेक करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. यामुळे समाजात सामूहिक रोग प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) तयार होऊन कोरोना संसर्गाला ब्रेक लावता येणार आहे. यासाठी जिल्ह्यात १०० वर केंद्रांद्वारे लसीकरण होत आहे. मात्र, पुरवठ्याअभावी यात सातत्य नाही. सोमवारी सायंकाळी लसींचा साठा संपुष्टात आला. त्यामुळे मंगळवारपासून लसीकरण बंद आहे. काही केंद्रांवर थोडाफार लसी शिल्लक होत्या. यामुळे १० ते १२ केंद्रे मंगळवारी दुपारपर्यंत सुरू होती. त्यानंतर मात्र जिल्ह्यातील लसीकरण ठप्प आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ७,३९,३४० लसींचा पुरवठा झालेला आहे. यात ५,८२,३३० कोविशिल्ड, तर १,५७,०१० कोव्हॅक्सिनचा समावेश आहे. याद्वारे जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या २३ टक्के लसीकरण झालेले आहे. मात्र, दोन्ही डोस घेणारे नागरिक सहा टक्केच आहेत. त्यामुळे तोडांवर असलेल्या तिसऱ्या लाटेचा सामना कसा करणार, कोरोनाचा संसर्ग कसा रोखणार, हा नागरिकांचा सवाल आहे.
स्टॉक संपल्यानंतर अद्यापही पुरवठा नाही : मंगळवारपासून केंद्रांना टाळे
७,५६,३९० लसीकरण
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून पाच टप्प्यात लसीकरण होत आहे. यामध्ये ५,६०,७८१ नागरिकांनी पहिला व १,९६,१४९ नागरिकांनी लसींचा दुसरा डोस घेतला आहे. आतापर्यंत ६,०६,७८१ नागरिकांनी कोविशिल्ड व १,५०,१४९ नागरिकांनी कोव्हॅक्सिनचा डोस घेतला आहे. आतापर्यंत सर्वाधिक २,६३,२५५ लसीकरण ज्येष्ठ नागरिकांचे झाले आहे.