पाच मुद्द्यांवर रवि राणांचे विधान भवनावर फलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:16 IST2021-07-07T04:16:04+5:302021-07-07T04:16:04+5:30
जनसामान्यांच्या मागण्यांकडे वेधले लक्ष, मुख्यमंत्री अक्षम असल्याचा दावा अमरावती : जनसामान्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या पाच मुद्द्यांवर आ. रवि राणा यांनी ...

पाच मुद्द्यांवर रवि राणांचे विधान भवनावर फलक
जनसामान्यांच्या मागण्यांकडे वेधले लक्ष, मुख्यमंत्री अक्षम असल्याचा दावा
अमरावती : जनसामान्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या पाच मुद्द्यांवर आ. रवि राणा यांनी मुंबईच्या विधान भवनावर फलक झळकवून शासनाचे लक्ष वेधले. विधानसभेच्या दोन दिवसांच्या अत्यल्प कालावधीतील अधिवेशनात जनतेचे प्रश्न मांडण्याची संधीच देण्यात आली नसल्याचे पाहून आ. राणा यांनी हा अभिनव पवित्रा घेतला. मुख्यमंत्री राज्य सरकार चालवण्यासाठी सक्षम नाहीत, असा दावा त्यांनी केला आहे.
कोरोनाकाळात प्रचंड वाताहत झालेल्या राज्यातील शेतकरी, शेतमजूर, सर्वसामन्य जनतेच्या समस्या, विद्यार्थी, बेरोजगारांना दिलासा, मराठा समाज, ओबीसी समाज, धनगर समाजाला आरक्षण या महत्त्वाच्या विषयांवर न्याय मिळवून देण्यासाठी १५ दिवस अधिवेशन चालवून चर्चा करण्याची मागणी आ. रवि राणा यांनी केली होती. मात्र, जनतेचे समस्यांशी देणे-घेणे नसलेल्या सरकारने दोन दिवसांत अधिवेशन गुंडाळले आहे. ६ जुलै रोजी आ. रवि राणा यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र देऊन सभागृहात पत्रातील नमूद विषयावर चर्चा करून, त्या मागण्या सरकार कडून मंजूर करण्याची मागणी केली होती. मात्र, अध्यक्षांपुढील राजदंड उचलला तरीही त्यांना बोलू दिले नाही. यामुळे आ. रवि राणा यांनी विधान भवनावर चढून त्यांच्या पत्रातील पाच मुद्द्यांचे फलक झळकवले.