शिधापत्रिकाधारकांना रेशन धान्याचे 'एसएमएस'
By Admin | Updated: August 1, 2016 00:03 IST2016-08-01T00:03:35+5:302016-08-01T00:03:35+5:30
सार्वजनिक अन्नधान्य वितरण व्यवस्थेला लागलेली भ्रष्टाचाराची किड संपुष्ठात आणण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा मंत्रालयाने सकारात्मक पुढाकार घेतला आहे.

शिधापत्रिकाधारकांना रेशन धान्याचे 'एसएमएस'
काळाबाजारावर अंकुश : अंमलबजावणीकडे लक्ष
अमरावती : सार्वजनिक अन्नधान्य वितरण व्यवस्थेला लागलेली भ्रष्टाचाराची किड संपुष्ठात आणण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा मंत्रालयाने सकारात्मक पुढाकार घेतला आहे. त्या अनुषंगाने शिधावाटप दुकानात प्राप्त झालेल्या अन्नधान्याबाबत शिधापत्रिकाधारकांना एसएमएस पाठविणे बंधनकारक करण्यात आले आहे.
अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत लाभार्थ्यांना अन्नधान्य वाटप करण्यात येते. अन्नधान्याच्या वितरणामध्ये पारदर्शकता येण्याच्या दृष्टीने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने राज्यातील सर्व संबंधितांसाठी सूचना दिल्या आहेत. लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामांपासून लाभार्थ्यांपर्यंत अन्नधान्य पोहोचविण्याच्या प्रक्रियेमध्ये विभागाला पारदर्शकता अपेक्षित आहे. त्या दृष्टीने निश्चित अशी कार्यपद्धती आखून देण्यात आली आहे.
सुधारित अन्नधान्य वितरण पद्धती अंतर्गत अन्नधान्य पोहोच केल्यानंतर त्या क्षेत्रातील, गावातील किमान दोन व्यक्तींची साक्षीदार म्हणून वाहतूक पासवर स्वाक्षरी असणे आवश्यक करण्यात आले आहे. याशिवाय खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर, नगरपरिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, सरपंचांना अन्नधान्य, साखर व केरोसीनच्या नियतनाच्या आदेशाच्या प्रति देण्यात येणार आहेत. धान्य पोहोचल्याबाबतची व त्याच्या वाटपाबाबत गावात दवंडी देणे व त्या दवंडीची नोंद ठेवणे रास्त भाव दुकानदारांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
एसएमएस सुविधेमध्ये लाभार्थ्यांची नोंदणी
सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये गोदाम ते गाव या दरम्यान सर्वाधिक अफरातफर होण्याचे प्रकार उघड झाले आहेत. त्यावर अंकूश राखण्याकरिता ‘एसएमएस’ प्रणालीचा उतारा शोधण्यात आला आहे. शिधावाटप दुकानात प्राप्त झालेल्या अन्नधान्याबाबत किमान २५० लाभार्थ्यांना एसएमएस करणे बंधनकारक आहे. ‘सप्लाय चेन मॅनेजमेंट’ प्रणालीवरील एसएमएस सुविधेमध्ये लाभार्थ्यांची नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
संकेतस्थळावर ‘अपलोडींग’
अन्नधान्य वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने शिधापत्रिकाधारक आणि एकुणच व्यवस्थेचे संगणकीकरण हाती घेण्यात आले आहे. त्यात ९० टक्क्याच्यावर शिधापत्रिका आधारशी ‘लिंकअप’ करण्यात आल्या आहेत. पुरवठा साखळी व्यवस्थापन आॅनलाईन नियतन वितरणासाठी प्रणाली, द्वारपोच योजना, अन्नधान्य, साखार व केरोसीनचे नियतन व वाटपाची माहिती संकेतस्थळावरही ‘अपलोड’ करण्यात येणार आहे.