खरिपाच्या पीक कर्जवाटपाची दरनिश्चिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:12 IST2021-03-28T04:12:56+5:302021-03-28T04:12:56+5:30
अमरावती : चार दिवसांनी खरीप २०२१ करिता प्रक्रिया सुरू होणार असल्याने राज्य समितीद्वारा पिकनिहाय कर्जदर जाहीर केले आहे. आगामी ...

खरिपाच्या पीक कर्जवाटपाची दरनिश्चिती
अमरावती : चार दिवसांनी खरीप २०२१ करिता प्रक्रिया सुरू होणार असल्याने राज्य समितीद्वारा पिकनिहाय कर्जदर जाहीर केले आहे. आगामी पीकस्थिती व पाऊस व सर्व स्थितीचे अवलोकन करून जिल्हा अग्रणी बँकेद्वारा यंदाच्या खरीप व रबी पीक कर्जवाटपाचे लक्ष्यांक निश्चित केल्या जाणार आहे.
दरवर्षी राज्य समितीद्वारा पीक कर्जवाटपाचे दर जाहीर केले जातात. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा तांत्रिक समितीची बैठक होऊन आवश्यक ते बदल केले जातात. यंदा मात्र, जिल्हा समितीने बैठक घेऊन यंदाच्या खरीप हंगामासाठी पीक कर्जवाटपाचे दर निश्चित केले व त्यानंतर याविषयीचा प्रस्ताव राज्य समितीला पाठविला होता. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अजित देशमुख यांनी २३ मार्च रोजी याविषयीची सुची पाठविली आहे.
याशिवाय किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत खेळते भांडवली कर्जासाठीदेखील कर्जदर निश्चत केले आहे. यानुसार दुग्ध पालनासाठी एक गाय, १२ हजार, १ म्हैस १४ हजार, शेळी, मेंढी पालनासाठी १० युनिटसाठी १२ ते २० हजार, कुक्कूटपालनासाठी १०० पक्ष्यांचे युनिटमध्ये ब्रायलरला आठ हजार, लेयरला १५ हजार व गावठीला पाच हजार, मत्स्यपालनासाठी प्रतीहेक्टरी शेततळे सर्वजाती मत्स्यलनाकरिता २.२० लाख असे राहतील. दोन दिवसांत जिल्ह्यातील बँकांचे लक्ष्यांकदेखील जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सहकार विभागाने दिली.
बॉक्स
खरिपासाठी हेक्टरी दर
सोयाबीन : ४९ हजार
तूर : ३५ हजार
मूग : २० हजार
उडीद : २०हजार
भूईमूग : ४४ हजार
कपाशी : ५९ हजार
मका : ३० हजार
बाॅक्स
फळपिक व भाजीपाला पिकांचे दर
भाजीपाला पिकांसाठी मिरचीला हेक्टरी ७५ हजार, टोमॅटोला ८० हजार, कांद्याला ६५ हजार, हळदीला १ लाख ५ हजार, कोबी ४२ हजार, फुल पिकांना ३२ ते ४० हजार, केळीसाठी १ लाख, संत्र्याला ८८ हजार, चारा पिकांमध्ये मका ३२ हजार, बाजरी १६ हजार व ज्वारीला हेक्टरी २२ हजार रुपये कर्जवाटपाची निश्चिती राज्य समितीद्वारा करण्यात आलेली आहे.