रणरागिणींनी केली अवैध दारूची होळी
By Admin | Updated: October 14, 2016 01:06 IST2016-10-14T01:06:33+5:302016-10-14T01:06:33+5:30
वारंवार तक्रारी, आंदोलने करूनही थिलोरी येथील अवैध दारूविक्री बंद होत नाही. काही काळ हा प्रकार थंडावतोे मात्र पोलिसांच्या वरदहस्तामुळे तो पुन्हा सुरू होतो.

रणरागिणींनी केली अवैध दारूची होळी
थिलोरी येथील घटना : गावात येणारी दारू पकडली
दर्यापूर : वारंवार तक्रारी, आंदोलने करूनही थिलोरी येथील अवैध दारूविक्री बंद होत नाही. काही काळ हा प्रकार थंडावतोे मात्र पोलिसांच्या वरदहस्तामुळे तो पुन्हा सुरू होतो. यामुळे परिसरातील रणरागिणींनी स्वत:च दारूविक्री रोखण्यासाठी कंबर कसली असून बुधवारी दर्यापूर ते थिलोरी मार्गावर गावात दारू घेऊन येणाऱ्या एका युवकाला पकडून त्याच्याकडील तीन पेट्या दारू हिसकावून त्या बाटल्यांची दारूविक्रेत्याच्या घरासमोरच होळी केली.
यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संदीप धर्माळे, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य संगीता चोरपगार आदींचीही उपस्थिती होती. यावेळी महिलांनी आक्रमक पवित्रा घेत गावात अवैध दारूविक्री होऊ देणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त केला.
या आंदोलनात गावकरी महिलांसह ग्रामपंचायत सदस्य अविनाश कोलटक्के, उपसरपंच अनिल होले, कमल वाकपांजर, पोलीस पाटील आनंद वर्धे, मिलिंद वाकपांजर, छाया वाकपांजर, बेबी वाकपांजर यांचा सहभाग होता.
थिलोरी या गावात मागील कित्येक वर्षांपासून अवैध दारूविक्री सुरू आहे. मात्र, पोलिसांचा वचक नसल्याने दारूविक्रेते निरंकुश झाले आहेत. दारू सहजासहजी उपलब्ध होत असल्याने गावातील तरूण व्यसनाधिन झाले आहेत. संसार उद्धवस्त होत आहेत. गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यात यावी, याच मागणीसाठी गावातील महिलांनी महिनाभरापूर्वी रास्ता रोको आंदोलन देखील केले होते. त्यानंतर महिनाभर गावात अवैध दारू विक्री बंद झाली होती. परंतु पुन्हा सर्रास दारूविक्री सुरू आहे. गावात एकूण पाच दारू दुकाने आहेत. त्यांच्यावर गावकरी महिलांनी दारूविक्री बंद करण्याबाबत दबाव आणला असता पोलिसांना हप्ते देत असल्याने आमचे कुणीच काही वाकडे करू शकत नाही, असे उत्तर दिले जात असल्याचा आरोेप महिलांनी केला आहे. (शहर प्रतिनिधी)