दारूबंदीसाठी रणरागिणींचा एल्गार !
By Admin | Updated: July 26, 2016 00:20 IST2016-07-26T00:20:19+5:302016-07-26T00:20:19+5:30
सर्वधर्म समभावाचे व धार्मिक सौहार्दाचे अनोखे उदाहरण ठरलेले भातकुली तालुक्यातील गणोरी हे गाव.

दारूबंदीसाठी रणरागिणींचा एल्गार !
गणोरीच्या महिला ‘लोकमत’मध्ये : भातकुली पोलिसांच्या आशीर्वादाने दारुविक्रेत्यांची गुंडागर्दी
अमरावती : सर्वधर्म समभावाचे व धार्मिक सौहार्दाचे अनोखे उदाहरण ठरलेले भातकुली तालुक्यातील गणोरी हे गाव. हिंदू-मुस्लिमांचे श्रद्धास्थान संत महंमद खान बाबांचे अधिष्ठान असलेल्या या गावातील अनेक महिला अवैध दारूविक्री आणि दारूविक्रेत्यांच्या मुजोरीने हैराण झाल्या आहेत. अनेकांसमोर कैफियत मांडूनही काहीच लाभ न झाल्याने अखेरीस या स्त्रीशक्तीने सोमवारी ‘लोकमत’ कार्यालय गाठून त्यांच्या वेदना मांडल्या. हप्तेखोर पोलिसांच्या आशीवार्दाने गावात फोफावलेला अवैध दारू व्यवसाय तातडीने बंद करावा, असह््य झालेले जगणे किमान सुसह््य करावे, अशी त्यांची मागणी होती.
अवैध दारूमुळे उघड्यावर येऊ पाहणारे संसार सावरण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या ग्रामीण भागातील करारी महिलांचा एकूणच रोख गणोरीतील दारूविक्रीची समस्या किती गंभीर आहे, हे दर्शविणारा होता. गणोरी गावात बहुतांश शेतमजुरांचा भरणा. हातावर आणून पानावर खाणारी अनेक कुटुंबे येथे वास्तव्याला आहेत. गाव तसे धार्मिक. पण, निसार खाँ मस्तान खाँ पठाण, सुभाष राणे, विजय देठे आणि दुर्गा वावरे या दारूविक्रेत्यांनी सर्रास अवैध दारूविक्री सुरू केली. त्यामुळे गावाची शांतता तर धोक्यात आलीच आहे. पण, संसारही उद्धवस्त होत असल्याचा टाहो या महिलांनी फोडला. सहज उपलब्ध होत असलेल्या दारूमुळे तरूण मुलेदेखील व्यसनाधीन होत आहेत.
दररोज सहाशे पावट्यांची विक्री
येथील चारही दारू दुकानांमधून दररोज दारूविक्री सुरू आहे. एका दुकानातून सरासरी दररोज दीडशे पावट्यांची विक्री होते. यानुसार गावातून दररोज अंदाजे सहाशे पावट्यांची विक्री होते. यावरून गावात किती भयंकर स्थिती आहे, याचा अंदाज येऊ शकतो. या विक्रेत्यांना परिसरातील गावांमधून दारुचा पुरवठा होतो. सर्वांचेच जाळे पोलिसांशी जुळलेले आहे.
पोलिसांचा वरदहस्त
दारूविक्रेत्यांनी मुलीला धमक्या दिल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी भातकुली पोलीस ठाण्यावर धडक दिली. तक्रार केली असता भातकुलीच्या ठाणेदारांनी अवैध दारूविक्रेत्यांना दूरध्वनीवरून आधीच सूचना देऊन तपासणीपूर्वीच माल लपवून ठेवण्यास सांगितल्याचा थेट आरोप महिलांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून केला.
दुपटीच्या दराने दारूविक्री
भातकुलीतील हप्तेखोर पोलिसांच्या वरदहस्तामुळे मस्तवाल झालेल्या दारूविक्रेत्यांनी दारूचे भाव थेट दुप्पट केले आहेत. एका पावटीचा भाव थेट ९० रूपयांवर पोहोचला आहे. दारुबंदीसाठी ठराव घेतल्याने आणि भातकुली पोलिसांना तक्रार केल्याने फावले ते दारुविक्रेत्यांचेच. पोलिसांच्या समर्थनाशिवाय हे शक्यच नाही, असा सूर तमाम महिलांचा होता.
पोलिसांनीच पुरविली माहिती
अमरावती : घराघरांतील कर्ते पुरूष दिवसभर राब-राब राबतात. सायंकाळी १० रुपये हाती ठेवून अख्खी मजुरीचे पैसे दारू गुत्त्यावर खर्ची घालतात. तेथून झिंगतच ते घरी पोेहोचतात. मद्यधुंद अवस्थेत बायका-मुलांना बेदम मारहाण करतात. मिळविलेला पैसा दारू दुकानांमध्येच रिता होत असल्याने अनेक कुटुंबांवर उपाशी राहण्याची वेळ येते. गावातील या चारही दारू दुकानांना भातकुली, लोणी येथून दारूचा पुरवठा होतो. गावातील तब्बल ६० टक्के लोक दारूच्या आहारी गेलेले आहेत. दारूपायी होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून अलिकेच गावांतील एका महिलेने आत्महत्या केली. दुसऱ्या एकीला फास लावता-लावता वाचविल्याचे भीषण वास्तव या महिलांनी 'लोकमत'कडे कथन केले.
गणोरी गावांत कोरमअभावी आजतागायत ग्रामसभा झालेली नाही. दारूबंदीच्या ठरावासाठी मात्र गणोरीच्या ग्रामसभेत 'ओव्हर फ्लो' होणारी महिलांची गर्दी होती. महिला सरपंचांच्या उपस्थितीत दारुबंदीचा ठराव पारित झाला. त्यानंतर दारूविक्रेत्यांनी अधिकच मग्रुरीने गावकऱ्यांना धमकावणे सुरू केले आहे. दारुविक्रेत्यांनी परिसरात दहशत निर्माण केली. महिलांसह गावकऱ्यांनी भातकुली पोलिसांकडे दाद मागितली. पण, पोलिसांनी दारूविक्रेत्यांना फोन करून सारी माहिती दिली. त्यानंतर धाड घातली, अशी कैफियत सुमारे १०० महिलांनी 'लोकमत'कडे मांडली. निडर लिखाण करणारे 'लोकमत'च आम्हाला न्याय मिळवून देऊ शकते, असा विश्वास या महिलांचा होता.
महिला भातकुली पोलिसांना वारंवार भेटल्या असल्या तरी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना भेटलेल्या नसल्याचे लक्षात आल्यावर 'लोकमत'ने पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला. सर्व महिलांना पोलीस आयुक्तांची वेळ मिळवून दिली.
पोलीस आयुक्तांना महिलांनी सविस्तर निवेदन दिले. दारूमुळे सोसाव्या लागणाऱ्या वेदना कथन केल्या. महिलांच्या या तळमळीची दखल पोलीस आयुक्तांनी घेतली. 'लोकमत'चे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. दारूविरोधी एल्गार पुकारणाऱ्या महिलांमध्ये वृषाली गावंडे, सुनंदा राऊत, मंदा शेंदूरजने, मनोरमा काळमेघ, शीला खंडारे, दुर्गा टेकाडे, दीपाली पराळे, अनिता वानखडे, छाया राऊत, कमल वानखडे, प्राजक्ता चौखंडे, निकिता खंडारे, सरिता कदम, अनिता सावळे, मालू राऊत, कांता इंगळे, अर्चना तानोडे आदींसह सुमारे शंभर महिलांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)