खोडके गटाच्या रिना नंदा महापौर - उपमहापौरपदी काँग्रेसचे शेख जफर
By Admin | Updated: September 9, 2014 23:07 IST2014-09-09T23:07:05+5:302014-09-09T23:07:05+5:30
अमरावतीच्या १४ व्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या चरणजित कौर ऊर्फ रिना नंदा तर उपमहापौरपदी काँग्रेसचे शेख जफर शेख जब्बार हे विजयी झालेत. या निवडणुकीत दोघांनीही प्रत्येकी ४७ मते

खोडके गटाच्या रिना नंदा महापौर - उपमहापौरपदी काँग्रेसचे शेख जफर
सत्तेची पुनर्स्थापना : रावसाहेब शेखावत, संजय खोडके यांच्यात हातमिळवणी
अमरावती : अमरावतीच्या १४ व्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या चरणजित कौर ऊर्फ रिना नंदा तर उपमहापौरपदी काँग्रेसचे शेख जफर शेख जब्बार हे विजयी झालेत. या निवडणुकीत दोघांनीही प्रत्येकी ४७ मते प्राप्त केलीत. शेख जफर यांना दुसऱ्यांदा उपमहापौरपदी विराजमान होण्याची संधी मिळाली आहे. आ. रावसाहेब शेखावत आणि संजय खोडके यांनी हातमिळवणी करून महापालिकेत सत्ता पुनर्स्थापित केली.
महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात मंगळवारी महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या पीठासीनाखाली पार पाडली. आयुक्त अरुण डोंगरे, नगरसचिव मदन तांबेकर यांनी प्रक्रियेत सहभाग घेतला. सकाळी ११ वाजता सुरु झालेल्या महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक दुपारी १.१५ वाजता संपली. दरम्यान महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी अर्जाची छानणी प्रक्रिया आटोपताच प्रथम सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी महापौर पदाची निवडणूक घेण्यात आली. महापौरपदासाठी प्राप्त ८ उमेदवारांच्या अर्जापैकी चार सदस्यांनी अर्ज मागे घेतला. यात भाजपच्या मंजुषा जाधव, हेमलता साहू, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयश्री मोरय्या तर राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या हमीदा बानो शेख अफजल चौधरी यांचा समावेश होता. महापौरपदासाठी रिंगणात राष्ट्रवादीच्या सपना ठाकूर, सेना- भाजप, रिपाइंच्या रेखा तायवाडे, बसपाच्या गुंफाबाई मेश्राम तर राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या रिना नंदा होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे गणित बिघडले
महापौरपदावर डोळा ठेवून बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात नगरसेवकांना काँग्रेस आपल्याशीच आघाडी करेल, अशी आशा होती. या आघाडीसाठी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ स्तरावरील नेत्यांनी काँग्रेसवर दवाबतंत्राचाही वापर केला होता. परंतु या दवाबतंत्राची कोणतीही जादू काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांवर चालली नाही. अखेर काँग्रेसने महापालिकेत सत्तेत कायम राहण्यासाठी संजय खोडके यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटशी हातमिळवणी करुन पूर्वीच्या करारानुसार त्यांना महापौर तर आपल्याकडे उपमहापौरपद कायम ठेवत शहराच्या राजकारणाला वेगळी कलाटणी देण्याचा प्रयत्न चालविला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला.
बसपने ‘व्हीप’ काढलाच नाही
महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत सहा सदस्य संख्या असलेल्या बहुजन समाज पक्षाने कोणाला मतदान करावे, याबाबत अधिकृत ‘व्हीप’ काढला नाही. मात्र, या निवडणुकीत बसपने महापौरपदासाठी गुंफाबाई मेश्राम तर उपमहापौरपदासाठी दीपक पाटील यांचे अर्ज कायम ठेवले होते. विजयासाठी संख्याबळ नसताना देखील बसपने महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक लढविली. त्यांना केवळ तीन मतांवर समाधान मानावे लागले. परंतु गटनेता अजय गोंडाणे, दीपमाला मोहोड व अलका सरदार यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या बाजुने मतदान केले.