राणा लॅन्डमार्कची १७ कोटींची संपत्ती जप्त
By Admin | Updated: June 9, 2015 00:30 IST2015-06-09T00:30:08+5:302015-06-09T00:30:08+5:30
जिल्ह्यात चर्चेत असलेले राणा लॅन्डमार्क फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत राणा बंधूंची १७ कोटीची ...

राणा लॅन्डमार्कची १७ कोटींची संपत्ती जप्त
अमरावती : जिल्ह्यात चर्चेत असलेले राणा लॅन्डमार्क फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत राणा बंधूंची १७ कोटीची संपत्ती जप्त केली आहे. त्याकरिता प्रशासक नेमण्याचा प्रस्ताव आर्थिक गुन्हे शाखेने जिल्हाधिकाऱ्यामार्फत गृहविभागाला पाठविला आहे.
घरकुलांचे स्वप्न दाखवून राणा लॅन्डमार्कच्या पदाधिकाऱ्यांनी गुंतवणूकदारांची कोट्यवधीने फसवणूक केली आहे. २५ सप्टेंबर २०१४ रोजी शरद भिमराव कुकडे (रा.शिरजगाव , भिकमराय) यांनी राणा लॅन्डमार्कविरोधात शहर कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे ४९५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तक्रारीनुसार राणा लॅन्डमार्कने १० कोटीने फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी योगेश नारायण राणा, चंद्रशेखर राणा व त्यांचा मॅनेजर शशिकांत निरंजन जिचकार यांच्याविरूध्द भादंविच्या कलम ४०३, ४०६, ४०९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ३४ अन्वये व कलम ३ एमपीआयडी नुसार गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी तीनही आरोपींना अटक करुन चौकशी पुर्ण केली आहे. याप्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. चौकशीअंती पोलिसांनी राणा लॅन्डमार्कच्या पदाधिकाऱ्यांची ४७ ठिकाणी असणारी संपत्ती जप्त केली.