राणा लँडमार्ककडून फसवणूक - ३३६ गुतंवणूकदारांच्या तक्रारी
By Admin | Updated: October 8, 2014 22:57 IST2014-10-08T22:57:51+5:302014-10-08T22:57:51+5:30
दोन वर्षे हप्त्याचा भरणा केल्यानंतर फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून शेकडो नागरिकांची कोट्यवधी रूपयांनी फसवणूक करणारे राणा लँडमार्कचे संचालक योगेश राणाविरुध्द आतापर्यंत ३३६ गुतवणूकदारांनी

राणा लँडमार्ककडून फसवणूक - ३३६ गुतंवणूकदारांच्या तक्रारी
अमरावती : दोन वर्षे हप्त्याचा भरणा केल्यानंतर फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून शेकडो नागरिकांची कोट्यवधी रूपयांनी फसवणूक करणारे राणा लँडमार्कचे संचालक योगेश राणाविरुध्द आतापर्यंत ३३६ गुतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश अणे यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.
राणा लँडमार्कचा मुख्य सूत्रधार योगेश राणा याला २५ सप्टेंबर रोजी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने अटक केली. चौकशीदरम्यान योगेश राणा याने शहरातील ९६२ नागरिकांकडून गुंतवणुकीच्या नावावर पैसे घेतल्याची कबुली दिली होती. यामध्ये ३३६ गुतवणूकदारांकडून राणा याने ५ कोटी ४१ लाख २३ हजार रुपये उकळले. परंतु त्यांना फ्लॅट उपलब्ध करुन दिले नाहीत. शहर कोतवाली पोलीस ठाण्यांतर्गत दाखल तक्रारीवरून योगेश राणाला अटक करण्यात आली होती. आरोपीला अटक केल्यावर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने योगेश राणा याचे सहा बँकांमधील खाते गोठविले. ज्यामध्ये ५२ हजार ८६६ रुपये आहेत. या व्यतिरिक्त त्याच्या कार्यालयातून पोलिसांनी १ लाख १६ हजार रुपयांचा माल जप्त केला होता. योगेश राणाला १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मंगळवारी पुन्हा आरोपी योगेश राणाला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी आणखी एक दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली. याप्रकरणी आणखी काही आरोपींना अटक केली जाऊ शकते, अशी माहिती पोलीस निरीक्षक गणेश अणे यांनी दिली.