राम मेघे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची विद्यापीठावर धडक
By Admin | Updated: October 7, 2015 01:33 IST2015-10-07T01:33:11+5:302015-10-07T01:33:11+5:30
अभियांत्रिकीच्या परीक्षेचे काही पेपर ऐन दिवाळीच्या तोंडावर घेण्यात येणार आहेत. हे विद्यार्थ्यांसाठी गैरसोयीचे ठरणार आहे.

राम मेघे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची विद्यापीठावर धडक
विद्यार्थी आक्रमक : परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी
बडनेरा : अभियांत्रिकीच्या परीक्षेचे काही पेपर ऐन दिवाळीच्या तोंडावर घेण्यात येणार आहेत. हे विद्यार्थ्यांसाठी गैरसोयीचे ठरणार आहे. त्यामुळे ही परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी बडनेरा येथील राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठात धडक दिली.
अमरावती विद्यापीठाने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या द्वितीय, तृतीय व शेवटच्या वर्षाच्या सेमीस्टर परीक्षा ५ नोव्हेंबरपासून घेण्यात येणार आहेत. परीक्षेचे वेळापत्रकही घोषित झाले आहे. उन्हाळी-२०१५ च्या परीक्षेचा निकाल उशिरा लागल्याने अभ्यासक्रम सुरू होण्यास विलंब झाला. ‘सबमिशन’ अद्याप पूर्ण झालेले नाही. परीक्षेसाठी एक महिन्याचा अवधी विद्यार्थ्यांजवळ आहे. अशात दिवाळीच्या तोंडावर परीक्षा असल्याने या परीक्षा पुढे ढकल्याची मागणी घेऊन अभियांत्रिकीचे शेकडो विद्यार्थी विद्यापीठावर धडकले. निवेदन देऊन त्यांनी ही परीक्षा दिवाळीनंतर घेण्याची मागणी केली. सुरूवातीला ६ आॅक्टोबर रोजी मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयासमोर विद्यापीठाच्या या निर्णयाचा विरोध दर्शविला. विद्यापीठाच्या विरोधात नारेबाजीही केली. निवेदन देताना सिद्धांत निचत, सौरभ इंगळे, अक्षय मुरुमकर, केतन पिंजरकर, अजित राठोड उपस्थित होते. यानंतर विद्यार्थ्यांचा रोष लक्षात घेता विद्यापीठ व्यवस्थापनाने अभियांत्रिकीच्या परीक्षा रविवारच्या सुटीत घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)