राकाँ-काँग्रेसकडून ‘व्हीप’ जारी
By Admin | Updated: June 27, 2015 00:16 IST2015-06-27T00:16:30+5:302015-06-27T00:16:30+5:30
चिखलदरा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत वरिष्ठ नेत्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरुझाल्याचे दिसते.

राकाँ-काँग्रेसकडून ‘व्हीप’ जारी
चिखलदरा नगराध्यक्षपदाची निवडणूक : नामुष्की टाळण्यासाठी राकाँची धडपड
नरेंद्र जावरे अमरावती
चिखलदरा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत वरिष्ठ नेत्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरुझाल्याचे दिसते. कोणीही अध्यक्ष झाला तरी तो काँग्रेसचाच असेल, अशी स्थिती आहे. तर बहुमतात असलेल्या राष्ट्रवादीला नामुष्की टाळण्यासाठी धडपड करावी लागत असल्याचे चित्र आहे.
२९ जून रोजी चिखलदरा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. खोडके समर्थक राजेंद्रसिंह सोमवंशी व काँग्रेसतर्फे राजेश मांगलेकर यांनी नामांकन दाखल केले असून आमने-सामने अशी लढत होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी सभागृह गटनेत्यांना गुरुवारी (२५ जून) पक्षादेश जारी केल्याने राजकीय गोटात खोडकेंच्या विरोधात खेळी असल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादीची नामुष्की टाळण्याची धडपड?
चिखलदरा नगरपालिका सभागृहात एकूण १७ सदस्य असून नऊ सदस्यांसह राकाँ पूर्ण बहुमतात आहे. मात्र, जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये मोठे फेरबदल झाल्याने चित्र पालटले आहे. संजय खोडके यांनी राष्ट्रवादीला रामराम करीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला सध्या ते काँग्रेसचे सरचिटणीस आहेत. जिल्ह्यात काँग्रेसच्या बळकटीसाठी त्यांचे प्रयत्न असले तरी त्यांच्या गच्छंतीमुळे राष्ट्रवादीला पडलेले भगदाड त्रासदायक ठरत आहे. चिखलदऱ्याचे मावळते नगराध्यक्ष तथा विद्यमान उमेदवार राजेंद्रसिंह सोमवंशी व काही समर्थक नगरसेवक खोटके गटाचे आहेत. परिणामी २९ जूनच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर मोठे फेरबदल होणार आहेत. अशात पूर्ण बहुमतामध्ये असलेली राष्ट्रवादी अल्पमतात आली आहे. त्यामुळे एकूणच चिखलदऱ्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून हालचाली वाढल्या आहेत.
दोन्ही अध्यक्षांचे पक्षादेश
चिखलदरा नगर पालिका नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी तर्फे राजेंद्रसिंह सोमवंशी तर काँग्रेसतर्फे राजेश मांगलेकर यांनी उमेदवारी दाखल केली आहे. प्रत्यक्षात सोमवंशी यांनी राष्ट्रवादीच्या कुठल्याच नेत्याला विश्वासात न घेता संजय खोडके यांच्या नुसार उमेदवारी दाखल केली. आणि हिच बाब राष्ट्रवादीच्या जिल्हास्तरीय नेत्यांच्या जिव्हारी लागल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचा नगराध्यक्ष व्हावा यासाठी माजी आमदार केवलराम काळे यांनी हट्ट धरला. त्यासाठी त्यांनी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांना गळ घातले. त्यावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल वऱ्हाडे सोबत काँग्रेस नेत्यांची बैठक झाली व नगराध्यक्ष पदासाठी राजेश मांगलेकर तर उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीचे अरुण सपकाळ यांच्य नावाच पक्षादेश गटनेत्यांना देण्यात आला. गटनेते तो पक्षादेश नगरसेवकांना तामिल करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. यामध्ये राष्ट्रवादीला खोडकेचे वर्चस्व कमी करण्यासह बहूमतात असतांना नामुष्की टाळण्यासाठी धावपळ करावी लागत अस्लयाचे चित्र आहे.
नगराध्यक्ष काँग्रेसचाच : संजय खोडके
चिखलदरा नगराध्यक्षपदी राजेंद्रसिंह सोमवंशी किंवा राजेश मांगेलकर यांची निवड झाली तरी नगराध्यक्ष काँग्रेसचाच राहणार असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस संजय खोडके यांनी स्पष्ट केले. सोमवंशी राष्ट्रवादीचे असल्याचे छेडल्यावर पक्षाचे काही बंधने असतात ते सुध्दा लवकरच दूर होईल. मि काँग्रेसमध्ये असल्याने सोमवंशी सह समर्थक सुध्दा तिकडेच राहतील हे स्पष्ट असल्याचे खोडके म्हणाले.
संजय खोडके यांचे वर्चस्व कमी करण्यासाठी राष्ट्रवादी व काँग्रेस अध्यक्षाच्यावतीने पक्षादेश व गटनेत्यासाठी काढण्यात आला आहे. त्यावर असे काही जे असेल ते २९ जून नंतर बघू असेही संजय खोडके एका प्रश्नाच्या उत्तरावर म्हणाले.
माजी आमदार केवलराम काळे यांच्या आग्रहाखातर बहूमतात नसतांना काँग्रेसतर्फे मांगलेकर यांची उमेदवारी दाखल करण्यात अली आहे. तर अजूनपर्यन्त आपणातर्फे कुठल्याच प्रकारचा पक्षादेश जारी करण्यात आला नाही.
-बबलू ऊर्फ अनिरुध्द देशमुख,
जिल्हाध्यक्ष काँग्रेस
पक्षाच्या नेत्यांनी दिलेल्या आदेशानुसार आपण नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल केली. पक्षादेश आज मिळण्याची शक्यता आहे.
-राजेश मांगलेकर,
उमेदवार
जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे यांनी दिलेले पक्षादेश मिळाले पक्ष नेतृत्व सांगतील त्यानुसार काम करु. गटनेता सोमवंशी असल्याने ते कसे जारी करायचे याचे मार्गदर्शन घेतल्या जात आहे.
अरुण सपकाळ,
नगरसेवक, राष्ट्रवादी.