आरक्षणाच्या ‘लकी ड्रॉ’ने उठले आशा-निराशेचे तरंग
By Admin | Updated: October 8, 2016 00:15 IST2016-10-08T00:15:10+5:302016-10-08T00:15:10+5:30
महापालिका प्रभाग निवडणुकीच्या आरक्षणाची सोडत जसजशी जाहीर होऊ लागली आणि हताश झालेले नगरसेवक सभागृहाबाहेर पडू लागले,

आरक्षणाच्या ‘लकी ड्रॉ’ने उठले आशा-निराशेचे तरंग
इच्छुकांची झोप उडाली : निवडणूक आरक्षण सोडत
अमरावती : महापालिका प्रभाग निवडणुकीच्या आरक्षणाची सोडत जसजशी जाहीर होऊ लागली आणि हताश झालेले नगरसेवक सभागृहाबाहेर पडू लागले, एरवी अधिकारी आणि अनेकांशी तोऱ्यात बोलणारे इच्छुक पडलेल्या चेहऱ्याने जाताना पाहून कार्यकर्त्यांचाही धीर सुटला. प्रभाग आरक्षण सोडतीने शुक्रवारी देव पाण्यात घालून बसलेल्या इच्छुकांची झोप उडविली तर दुसरीकडे अनपेक्षितपणे लॉटरी लागल्याच्या आनंदात अनेकांना भरते आले.
फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या अमरावती महापालिका निवडणुकीसाठी प्रभागांच्या आरक्षणाची सोडत शुक्रवार ७ आॅक्टोबर रोजी टाऊन हॉलमध्ये सकाळी ११ वाजतापासून सुरू झाली. उत्सुकता शिगेला पोहोचल्याने बहुतांश नगरसेवक सकाळी १० वाजतापासूनच येथे स्थानापन्न झालेत. सोडतीच्या आधीच काहींनी प्रभाग रचना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ११.३० नंतर टाऊन हॉल आणि नेहरू मैदान परिसर नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांनी फुलून गेला होता. महत्त्वपूर्ण सोडतीसाठी जवळपास झाडून साऱ्या नगरसेवकांनी जातीने हजेरी लावली होती. ओळखीचे चेहरे दिसले तरी कसेबसे हसून ते आपली अस्वस्थता लपविण्याचा प्रयत्न करीत होते. पाच वर्षांत नगरसेवकांना एवढे अस्वस्थ पाहण्याची ही पहिली-दुसरीच वेळ होती.
महापालिकेवर निवडून जाण्याचा एक पहिला टप्पा म्हणजे प्रभाग आरक्षण सोडत. अर्थात मनासारखे आरक्षण जाहीर झाले की विजय हमखास असेही नाही. पण हव्या त्या प्रभागात हवे ते आरक्षण लागले नाही, तर उगाचच अधिकच्या खटपटी कराव्या लागतील, दुसऱ्या प्रभागात निवडणूक लढवायची म्हटले तर त्याही प्रभागात इच्छुकांची मांदियाळी, त्यामुळे परंपरागत प्रभागातच आरक्षण निघाव्यात, अशी भावना प्रत्येकाची होती. सभागृहात लॉटरीचे काम सुरू असतानाच जाहीर झालेल्या आरक्षणानंतर इच्छुक आणि विद्यमान नगरसेवकांच्या चर्चेचा सूर क्षणात बदलत होता. एकंदरितच शुक्रवारच्या आरक्षण सोडतीदरम्यान तब्बल तीन तास आशा-निराशेचे रंग सर्वांनीच अनुभवले. (प्रतिनिधी)