राजापेठ रेल्वेपुलाचे पुन्हा भूमिपूजन!
By Admin | Updated: August 23, 2014 23:41 IST2014-08-23T23:41:49+5:302014-08-23T23:41:49+5:30
बहुप्रतिक्षित राजापेठ रेल्वे क्रॉसिंगवर प्रस्तावित उड्डाणपुलाचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते २५ आॅगस्ट रोजी पुन्हा भूमिपूजन होणार आहे. या उड्डाण पुलाचे लोकसभा निवडणुकीपूर्वी

राजापेठ रेल्वेपुलाचे पुन्हा भूमिपूजन!
नवा वाद : उपमुख्यमंत्री कार्यालयातून महापालिकेला पत्र
अमरावती : बहुप्रतिक्षित राजापेठ रेल्वे क्रॉसिंगवर प्रस्तावित उड्डाणपुलाचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते २५ आॅगस्ट रोजी पुन्हा भूमिपूजन होणार आहे. या उड्डाण पुलाचे लोकसभा निवडणुकीपूर्वी खासदारांनी घिसाडघाईत भूमिपूजन केले होते. आता नव्याने भूमिपूजनाचा सोहळा होत असल्याने राष्ट्रवादीविरुद्ध शिवसेना असा वाद रंगण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
उपमुख्यमंत्री पवार यांचे विशेष कार्य अधिकारी प्रशांत साजणीकर यांनी महापालिका आयुक्तांना २२ आॅगस्ट रोजी पत्र पाठवून उपमुख्यमंत्र्यांनी २५ आॅगस्ट रोजी विविध विकास कामांच्या भूमिपूजन समारंभाला उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तत्पूर्वी ज्या विकास कामांच्या भूमिपूजन समारंभाला उपस्थित राहायचे आहे त्या कामांना प्रशासकीय मान्यता अथवा परवानगी घेण्यात आली किंवा नाही याचा अभिप्राय त्यांनी मागितला आहे. हा अभिप्राय मिळताच उपमुख्यमंत्र्यांचा दौरा पाठविणे सोईचे होईल, असे मंत्रालयातून महापालिकेला पत्र प्राप्त झाले आहे. ज्या विकास कामांना प्रारंभ करावयाचा आहे ती कामे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे.
परंतु राजापेठ उड्डाणपुलाचे यापूर्वीच भूमिपूजन आटोपल्याने पुन्हा नव्याने भूमिपूजनाचा सोहळा कशाला, असा सवाल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रशांत वानखडे यांनी उपस्थित केला. हा भूमिपूजन सोहळा म्हणजे विधानसभा निवडणुकीचे गणित होय, असा आरोप वानखडे यांनी केला आहे. राजापेठ रेल्वे क्रॉसिंगवर प्रस्तावित उड्डाणपुलाच्या निर्मिसाठी खासदारांनी रेल्वे प्रशासनाकडून ११ कोटी रुपये मंजूर केले आहे. (प्रतिनिधी)