राजकुमार पटेल यांना अटक, सुटका
By Admin | Updated: July 13, 2015 00:29 IST2015-07-13T00:29:56+5:302015-07-13T00:29:56+5:30
मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांना वनाधिकाऱ्यांना शिवीगाळ व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी धारणी पोलिसांनी शनिवारी सायंकाळी अटक करुन परतवाडा येथे आणले.

राजकुमार पटेल यांना अटक, सुटका
वनविभागाची तक्रार : आदिवासी रस्त्यावर, धारणीत तणावसदृश स्थिती
अचलपूर/धारणी : मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांना वनाधिकाऱ्यांना शिवीगाळ व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी धारणी पोलिसांनी शनिवारी सायंकाळी अटक करुन परतवाडा येथे आणले. प्रकृती अस्वास्थ्यतेमुळे त्यांना रात्री उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले. रविवारी पहाटे परतवाडा पोलीस ठाण्यात आरोपीच्या कोठडीत २० मिनिटे ठेवल्याने तणावसदृश स्थिती निर्माण झाली होती.
हरिसाल येथील व्याघ्र प्रकल्पाच्या नाक्यावर उभ्या वाहनांना जबरीने नाका खुला केल्याचा आरोप पटेल यांच्यावर आहे. त्यासंदर्भात वन कर्मचाऱ्यांनी धारणी पोलिसात तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी शनिवारी सायंकाळी पटेल यांना अटक केली.
पोलीस व नेत्यांमध्ये हुज्जत
अचलपूर/धारणी : राजकुमार पटेल यांना अटक झाल्याची बातमी जिल्हाभर पसरताच नेत्याची वाहने धारणी व परतवाडाकडे वळली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, अनिल ठाकरे, नगरसेवक पवन बुंदेले व आदि नेत्यांनी उपजिल्हासह परवाडा पोलीसात धाव घेतली. तेव्हा त्यांनी राजकुमार पटेल कुठे आहेत विचारले असता, त्यांना लॉकअपमध्ये ठेवण्यात आल्याचे दिसले. तेव्हा एका माजी आमदाराला अशा पध्दतीने वागणूक देता का? यावर धारणी पोलिसांसोबत या नेत्यांनी हुज्जत झाली. परतवाड्याचे ठाणेदार गिरीष बोबडे यांना सदर प्रकरण निवळते घेतले. परतवाडा ठाण्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गर्दी वाढल्याने राजकुमार पटेल यांना लगेचच धारणी येथे नेण्यात आले.
शनिवारी सायंकाळी नानकराम बेठेकर यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्याने गोळी झाडून कुत्रा मारल्याची तक्रार धारणी ठाण्यात दाखल केली होती. राजकुमार पटेल हे नानकरामसह जमादार कपले व एका शिपायासह ज्याठिकाणी कुत्रा जमिनीत गाडलेला होता तेथे पोहोचून कुत्र्याचा मृतदेह ताब्यात घेऊन धारणीकडे येत असताना त्यांना एपीआय दिनेश सोनवणे व सुधाकर चव्हाण यांनी अटक करून परतवाडा ठाण्याकडे नेल्याची वार्ता कळताच धारणी शहरात वातावरण तापले. रंगभवन परिसरात हजारो पटेल समर्थक गोळा झाले. रविवारी दुपारी दोन वाजता पटेल यांना धारणी न्यायालयात आणण्यात आले. न्यायालयाने भविष्यात पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा होणार नाही, अशी अट ठेवत १५ हजार रुपयांच्या जातमुचलका व तेवढ्याच रकमेच्या जामिनावर सुटका केली. न्यायालयाबाहेर उभ्या असलेल्या समर्थकासह पटेल रंगभवन मैदानावर पोहोचले. तेथे त्यांनी सभा घेऊन अटक झालेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली. हरिसाल नाक्यावर महिला व लहान मुलांना दोन तासाच्या कालावधीप्रमाणे गेट बंद असल्याने रोखून ठेवले होते. त्यांना जावू द्यावे, अशी सूचना केल्याने पोलिसांनी खोटे आरोप लावून अटक केल्याचे सांगितले.