घराची किल्लीच ठरली राजेंद्र मेश्रामचा काळ!
By Admin | Updated: July 10, 2014 23:20 IST2014-07-10T23:20:15+5:302014-07-10T23:20:15+5:30
‘काळ आला पण वेळ आली नाही’असे आपण म्हणतो. पण, काळ आला की वेळ आपोआपच जुळून येते, याचा प्रत्यय वलगाव मार्गावरील अपघातादरम्यान पुन्हा एकदा आला. सिमेंटच्या पोत्यांनी भरलेल्या ट्रक खाली दबून

घराची किल्लीच ठरली राजेंद्र मेश्रामचा काळ!
वलगाव येथील अपघात : पत्नी बचावली अन् त्याचा झाला चेंदामेंदा
संजय पंड्या -अमरावती
‘काळ आला पण वेळ आली नाही’असे आपण म्हणतो. पण, काळ आला की वेळ आपोआपच जुळून येते, याचा प्रत्यय वलगाव मार्गावरील अपघातादरम्यान पुन्हा एकदा आला. सिमेंटच्या पोत्यांनी भरलेल्या ट्रक खाली दबून प्राण गमावणाऱ्या नांदुरा येथील राजेंद्र मेश्राम (४३) हे त्यांच्या पत्नीला घरी जाताना बघून फक्त घराची किल्ली देण्याकरिता पोहोचले आणि हा भीषण अपघात घडला.
राजेंद्र केशव मेश्राम यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. गुरूवारी नांदुरा गावातील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या केवट नामक महिलेचे निधन झाले होते. तिच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी राजेंद्र गेले होते. पत्नी शेतात कामावर गेली असल्याने राजेंद्र मेश्राम यांनी घराला कुलूप लावले होते. नांदुरा गावापासून १ किलोेमीटर अंतरावर लांब पेढी नदीच्या काठावर महिलेवर अंत्यसंस्कार सुरू होते. तेव्हा राजेंद्र यांना त्यांची पत्नी नर्मदा मेश्राम घराकडे परतताना आढळून आली. घराला कुलूप असल्याने पत्नीची पंचाईत होऊ नये, यासाठी अंत्यसंस्कारामधून उठून राजेंद्र पत्नीकडे गेले.
पत्नीला चावी देऊन पुन्हा परतण्याचा त्यांचा मानस होता. परंतु पत्नीजवळ पोहोचताच सिमेंटच्या पोत्यांनी भरलेला ट्रक मागून भरधाव त्यांच्याकडे आला आणि चालकाचे संतुलन बिघडल्याने ट्रक पलटला. या भीषण अपघातात राजेंद्र मेश्राम यांचा ट्रकखाली दबून मृत्यूू झाला. तर त्यांची पत्नी नर्मदा ट्रकच्या धक्क्याने दूरवर फेकल्या गेल्या.
त्यादेखील या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहे. पत्नीला चावी देण्याचे निमित्त झाले अन् राजेंद्र मेश्राम यांना काळाने हिरावून नेले. त्यांची पत्नीदेखील गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेत आहे. परिसरात शोककळा पसरली.