वातावरणात बदल : हवामान तज्ज्ञांचा अंदाज अमरावती : मागील आठवड्यात बरसलेल्या तुरळक पावसानंतर पाऊस पुन्हा बेपत्ता झाल्याने शेतकऱ्यांच्या आणि सामान्य नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तुलनात्मकदृष्ट्या विदर्भ अद्यापही कोरडाच आहे. मात्र, वातावरणातील काही बदलांमुळे पावसाबद्दल सकारात्मक स्थिती उत्पन्न झाली असून ३१ जुलै ते ३ आॅगस्टदरम्यान विदर्भासह राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस हजेरी लाऊ शकतो. पश्चिम राजस्थानवर असलेले कमी तीव्रतेचे वादळ उत्तरेकडे सरकून ते बिकानेरपासून उत्तर-पूर्वेकडे ८० किलोमीटर अंतरावर स्थिरावले आहे. येत्या २४ तासांत ते ‘ठळक कमी दाबाच्या’क्षेत्रामध्ये परावर्तित होऊ शकते. त्याचप्रमाणे बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आता ‘कोमेन’ नावाच्या चक्रीवादळात परावर्तित झाले असून ते चितगावपासून ९५ किलोमीटर आणि कोलकात्यापासून ३०० कि.मी. अंतरावर आहे. हे वादळ पश्चिम आणि पश्चिम-उत्तर दिशेला सरकण्याची शक्यता आहे. बांग्लादेशाच्या किनाऱ्यावर धडकून हे वादळ हळूहळू कमकुवत होणार आहे. उपरोक्त दोन्ही परिस्थितींमुळे विदर्भात पाऊस पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे, अशी माहिती हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी दिली. (प्रतिनिधी)
विदर्भात ३१ जुलैपासून पावसाची शक्यता
By admin | Updated: July 31, 2015 00:49 IST