मंडळनिहाय शेतकऱ्यांना ‘महारेन अॅप’वर पावसाची माहिती
By Admin | Updated: September 15, 2016 00:21 IST2016-09-15T00:21:28+5:302016-09-15T00:21:28+5:30
अमरावती कृषी विभागाने राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या सहकार्याने इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये ‘महारेन’ नावाचे अँड्राईड मोबाईल अॅप विकसित केले आहे.

मंडळनिहाय शेतकऱ्यांना ‘महारेन अॅप’वर पावसाची माहिती
नवा प्रयोग : कृषी विभागाने आणले नवे अॅप, शेतकऱ्यांसाठी फायदेशीर
अमरावती : अमरावती कृषी विभागाने राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या सहकार्याने इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये ‘महारेन’ नावाचे अँड्राईड मोबाईल अॅप विकसित केले आहे. राज्यातील ६५ हजार कृषी मंडळामध्ये दररोज होणाऱ्या पावसाची नोंद या अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एका अॅपवर मिळणार आहे.
राज्यातील सर्व कृषी मंडळातून दररोज पावसाची नोंद घेतली जाते. या पावसाची माहीती थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी कृषी आयुक्तालयातर्फे महारेन मोबाईल अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. या अॅपच्या माध्यमातून घरबसल्या माहिती उपलब्ध होईल. यापूर्वी काही निवडक ठिकाणी पडलेल्या पावसाची नोंद घेतली जात होती. त्यामुळे काही ठिकाणी पाऊस नसतानाही नोंद घेतली जात होती. यामुळे योग्य प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि विमा संरक्षणाचा लाभ मिळत नव्हता. ही बाब लक्षात घेऊन २०१३ मध्ये सर्व कृषी महसूल मंडळात स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रणा बसवण्यात आली. मात्र ही माहिती थेट शेतकऱ्यांना घेता येईल. (प्रतिनिधी)
मंडळनिहाय पर्जन्यमानाची होणार नोंद
इंटरनेट जोडणीच्या मदतीने ‘महारेन अॅप’ मोबाईलमध्ये डाऊनलोड करून राज्यातील विभाग, जिल्हा, तालुका आणि मंडळनिहाय पावसाची नोंद पाहता येईल. यामुळे शेतकऱ्यांना पावसाची आकडेवारी दररोज पाहता येईल. शिवाय साधारण पाऊस, प्रत्यक्ष पाऊस याचीही माहिती उपलब्ध होईल. यामुळे शेतकऱ्यांना अतिवृष्टी किंवा कमी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा दावा करणे सुलभ होईल.