पावसाची दडी, ६० टक्के पिके बुडण्याची भीती
By Admin | Updated: July 16, 2015 00:29 IST2015-07-16T00:29:37+5:302015-07-16T00:29:37+5:30
तालुक्यात जून अखेरपर्यंत ७१.७५ टक्के पेरणी पूर्ण झाली. मात्र मृगासह इतरही नक्षत्र कोरडेच गेल्याने अंकुरलेली पिके कोमेजली आहेत.

पावसाची दडी, ६० टक्के पिके बुडण्याची भीती
संत्रा उत्पादकही हादरले : दुबार पेरणीसाठी शेतकरी सावकाराच्या दारात
वरुड : तालुक्यात जून अखेरपर्यंत ७१.७५ टक्के पेरणी पूर्ण झाली. मात्र मृगासह इतरही नक्षत्र कोरडेच गेल्याने अंकुरलेली पिके कोमेजली आहेत. तालुक्यात ३४ हजार ४०० हेक्टरमध्ये पेरणी करण्यात आली. परंतु पावसाने २८ दिवसांपासून पाठ फिरविल्याने ६० टक्के पिके बुडण्याची भीती निर्माण झाली आहे. दुबार पेरणीसाठी पुन्हा शेतकऱ्यांना सावकारांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत तर विदर्भाच्या कॅलिफोर्नियातील संत्रा उत्पादकांनाही दुष्काळाचा जबर फटका बसण्याची शक्यता आहे.
वरुड तालुक्यात संत्रा कलमांचे मोठया प्रमाणात उत्पादन घेतले जाते. परंतु खरेदीदार शेतकऱ्यांची संख्या पावसामुळे रोडावली आहे. तालुक्यात तब्बल २८ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पेरलेले सोयाबिन, तूर, कपाशीचे पीक पूर्णत: बुडाले. कृत्रिम पध्दतीने ओलीत करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातच कपाशीचे पीक बहरलेले दिसून येत आहे. तालुक्यात ३४ हजार ४०० हेक्टर जमिनीत पेरणी झाली. परिससरात ७१ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. बियाण्यांचे अंकुर जमिनीबाहेर येऊन तापत्या उन्हामुळे कोमेजू लागले आहेत.
कपाशीची २६ हजार हेक्टरमध्ये तूर ६ हजार हेक्टर, मिरची २०० हेक्टर, सोयाबिन ८५० हेक्टर, मका २५० हेक्टर, ज्वारी ८२० हेक्टर आणि एरंडी ६७ हेक्टर तर हळदीची २० हेक्टरमध्ये पेरणी करण्यात आली. कोरडया दुष्काळाचे सावट असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मजुरांच्या हाताला काम नाही. दुबार पेरणीकरीता पुन्हा शेतकऱ्यांची वणवण भटकंती सुरू झाली आहे. पुन्हा बियाण्यांची जुळवाजुळव करण्यात बळीराजा व्यस्त आहे. पावसासाठी कुठे धोंडी तर कुठे धार्मिक कार्यक्रम, देवालयात घंटानाद केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)
बँकांचा नकार, पुन्हा सावकाराचाच आधार
जुलै महिन्याचा पूर्वार्ध संपला असताना सुध्दा अनेकांवर कृषी कर्जापासून वंचित राहण्याची वेळ येत आहे. बँका कर्जाचे पुनर्गठन करण्यात नकार देत आहेत. तर कुठे पुनर्गठन केले जात असेल तर त्या बँकेत गतवर्षीच्या कर्जाच्या व्याजाची कपात केली जात आहे. अशा आडमुठ्या धोरणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असून सावकाराच्या दारात जात आहे. मिळेल ते गहाण ठेऊन कर्ज घेऊन दुबार पेरणीची तयारी शेतकऱ्यांनी चालविली आहे. कोरडया दुष्काळाच्या सावटामुळे पेरणी झालेली बियाणी जमिनीत कोमेजली आहेत. तर थोड्याफार उगवलेल्या बियाण्यांना उन्हाचा फटका बसू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. मात्र, शासनाचे याकडे प्रचंड दुर्लक्ष असल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण असून शासनाने तातडीने शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत, अशी मागणी केली जात आहे.