अस्मानी संकटात सुल्तानी घोषणांचा पाऊस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:12 IST2021-07-27T04:12:49+5:302021-07-27T04:12:49+5:30

गजानन चोपडे राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे परवा अमरावतीत होते. गेल्या पाच दिवसांत झालेल्या अतिवृष्टीचा फटका सोसणाऱ्या कास्तकाराच्या तक्रारींची दखल ...

Rain of Sultani announcements in heavenly crisis! | अस्मानी संकटात सुल्तानी घोषणांचा पाऊस!

अस्मानी संकटात सुल्तानी घोषणांचा पाऊस!

गजानन चोपडे

राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे परवा अमरावतीत होते. गेल्या पाच दिवसांत झालेल्या अतिवृष्टीचा फटका सोसणाऱ्या कास्तकाराच्या तक्रारींची दखल न घेण्यात आल्याने कृषिमंत्री जाम संतापले. थेट पीक विमा कंपनी कार्यालयाची झाडाझडती घेतली. कुणीही विमा कंपनीवाल्यांना पाठीशी घालू नये, घातल्यास त्याच्यावरही कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा सज्जड इशारा खुद्द कृषिमंत्र्यांनीच दिल्यानंतर रविवारी रात्री उशिरा विमा कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कदाचित राज्यातील यावर्षीची ही पहिली कारवाई असावी. पहिली यासाठी की, आजवर कास्तकार विमा कंपनीच्या तक्रारी घेऊन शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवायचे. कृषिमंत्र्यांनी दम दिल्यानंतर यंदा पहिल्यांदा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यानेच कंपनीविरुद्ध पोलिसात धाव घेतली. कितीही आर्जव केली तरी सुनावणी होत नसल्याने पुरता खचलेला कास्तकार कृषिमंत्र्यांच्या ‘ॲक्शन मोड’मुळे काहीसा सुखावला, हे बरे झाले. शासकीय अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळेच या विमा कंपन्या गब्बर झाल्या आहेत. गेल्या वर्षी १ लाख ८५ हजार कास्तकारांनी पीक विम्यापोटी तब्बल १०९ कोटी रुपये कंपन्यांच्या घशात टाकले. केंद्र आणि राज्य शासनाचा वाटा पकडून हा आकडा ३५० कोटींच्या घरात जातो. जिल्ह्याची आणेवारी ४३ पैसे असून दुष्काळसदृश स्थिती असल्याचा तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल होता. असे असताना फक्त ६२ कोटी रुपयांचे वाटप विमा कंपन्यांकडून करण्यात आले. अर्थात केवळ २७ टक्के कास्तकार वगळता इतरांच्या तोंडाला पाने पुसली गेली. ढग ‘सरसकट’ दाटून येतात; पण ‘तत्त्वत:’ पाऊस पाडून शेती उत्थानाच्या निकषांची पार वाट लावून जातात. सरकारी भाषेत सांगायचे झाल्यास, सध्या कास्तकाराची हीच अवस्था झाली आहे. अतिवृष्टीने पार कंबरडे मोडले असताना पीक विमा कंपन्यांची मुजोरी सहन करण्याखेरीज त्याच्याकडे पर्याय नसतो. तक्रारीसाठी एखादा पुढे आला तरी नको ती बिलामत म्हणून इतर त्याला रोखतात. नेमका याचाच फायदा घेत विमा कंपन्या कास्तकाराचीच ‘सुपारी’ घेण्याचे धाडस दाखवित आहे. गेल्या सहा महिन्यात अमरावती विभागात ४६१ कास्तकारांनी विषाचा घोट घेतला. कास्तकार संघटित नाही, तो आंदोलन करत नाही, मतदानावर बहिष्कार टाकण्याची भाषाही तो वापरत नाही, तो फक्त विषाचे दोन घोट घेत जगाचा निरोप घेतो. म्हणून तर ‘चाय पे चर्चा’ होते, विषाची चर्चा कधीच होत नाही. लाखाहून अधिक शेतकरी सावकाराच्या दारात आहेत.

मागील पाच दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. अनेकांचा संसार उद्‌ध्वस्त झाला. अख्खे शेत पाण्याखाली गेले. होत्याचे नव्हते झाले. लोकप्रतिनिधींनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. अस्मानी संकटाच्या गर्तेत अडकलेल्या कास्तकाराला तातडीने नुकसानभरपाई मिळवून देण्याची ‘सुल्तानी’ घोषणा केली. या घोषणांची प्रत्यक्षात अंमलबजावणी व्हावी, त्यांचा हा दौरा नुसता ‘फोटो सेशन’चा इव्हेंट ठरू नये, अशी अपेक्षा कास्तकार करीत असेल तर त्याचे चुकले तरी कुठे..!

Web Title: Rain of Sultani announcements in heavenly crisis!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.