राजापेठ रेल्वे फाटकाची वाहतूक कोंडी सुटणार
By Admin | Updated: July 15, 2015 00:06 IST2015-07-15T00:06:12+5:302015-07-15T00:06:12+5:30
बहुप्रतिक्षित राजापेठ रेल्वे फाटकाजवळील वाहतूक कोंडी सुटण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

राजापेठ रेल्वे फाटकाची वाहतूक कोंडी सुटणार
उड्डाण पुलाची निविदा प्रक्रिया सुरू : महापालिका राहणार एजंसी
अमरावती : बहुप्रतिक्षित राजापेठ रेल्वे फाटकाजवळील वाहतूक कोंडी सुटण्याचा मार्ग सुकर झाला आहे. उड्डाण पूल निर्मितीची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून राज्यभरातील पाच नामांकित कंस्ट्रक्शन कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत. हा उडाणपूल महापालिका बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली पूर्णत्वास जाणार आहे.
काही वर्षांपासून रेंगाळत असलेला राजापेठ रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाण पूल निर्मितीचा प्रश्न आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या पुढाकाराने मार्गी लागला आहे. ३२.६३ कोटी रूपये खर्चून राजापेठ येथील उडाण पूल निर्माण केला जाणार आहे. मंगळवारपासून निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यात पाच कंस्ट्रक्शन कंपन्यांनी सहभाग घेतला आहे.
नागपूर येथील चाफेकर अॅन्ड कंपनी, नांदेड येथील शारदा कंस्ट्रक्शन अँड कार्पोरेशन प्रा. लि., पुणे येथील मनोजा स्थापत्य कंपनी, टी अँड टी इन्फ्रा प्रा. लि., मुंबई येथील बांका कंस्ट्रक्शन कंपनीने या निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला आहे. ई-टेंडरिंग प्रणालीने रेल्वे उड्डाण पुलाच्या निविदा मागविल्या आहेत. या निविदा उघडण्याला प्रारंभ करण्यात आला आहे.
राजापेठ रेल्वे उड्डाण पुलाची निर्मिती व्हावी यासाठी नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन उभे केले. या आंदोलनाचे फलित म्हणून उड्डाण पूल निर्मितीबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. निविदा प्रक्रिया राबविणे हे चांगले संकेत आहे.
- मुन्ना राठोड,
माजी नगरसेवक.
आता महापालिकेचा कारभार सुधारला आहे. आयुक्त चंद्रकांत गुडेवार हे कार्यक्षम अधिकारी असून त्यांच्या कारकिर्दीत राजापेठ उड्डाण पुलाची निर्मिती दर्जेदार होईल. महापालिका एजंसी म्हणून चांगल्या सुविधा देईल, अशी अपेक्षा आहे.
- रवी राणा, आमदार, बडनेरा.
राजापेठ उड्डाण पूल निर्मितीत येणारी अडचण दूर होण्याचे संकेत आहे. पाच निविदा प्राप्त झाल्याची ही चांगली बाब आहे. निधीची अडचण नाही. लवकरच हा उड्डाण पूल निर्माण करून नागरिकांना दिलासा देऊ.
- चंद्रकांत गुडेवार,
आयुक्त, महापालिका.
राजापेठ उडाणपूल निर्मितीसाठी शासनस्तरावर बैठका घेतल्या होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना या मागणीची तीव्रता लक्षात आणून दिली. परिणामी अर्थसंकल्पात आठ कोटी रूपये मंजूर करण्यात आले.
- रावसाहेब शेखावत,
माजी आमदार.
नागरिकांच्या मागणीनुसार राजापेठ रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाण पुलाच्या निर्मितीसाठी सातत्याने रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला. रेल्वेने ११ कोटी रुपयांची रक्कम जमा केली. निविदा प्रक्रियेने मार्ग सुकर केला.
- आनंदराव अडसूळ,
खासदार, अमरावती.