बडनेऱ्यात रेल्वे रुळ बदलविण्याचे काम युद्धस्तरावर
By Admin | Updated: December 7, 2014 22:42 IST2014-12-07T22:42:30+5:302014-12-07T22:42:30+5:30
भरधाव रेल्वे प्रवासी गाड्यांना अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी ब्रिटिशकाळापासून असलेले रेल्वे रुळ बदलविण्याचे काम युध्दस्तरावर सुरु आहे. अत्याधुनिक मशिनद्वारे हे काम बडनेरा रेल्वे

बडनेऱ्यात रेल्वे रुळ बदलविण्याचे काम युद्धस्तरावर
श्यामकांत सहस्त्रभोजने - बडनेरा
भरधाव रेल्वे प्रवासी गाड्यांना अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी ब्रिटिशकाळापासून असलेले रेल्वे रुळ बदलविण्याचे काम युध्दस्तरावर सुरु आहे. अत्याधुनिक मशिनद्वारे हे काम बडनेरा रेल्वे स्थानक परिसरात सुरु आहे. जानेवारी महिन्यात रेल्वेचे महाप्रबंधक येणार आहेत. त्यापूर्वी हे काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती आहे. यामुळे अपघातांवर नियंत्रण येणार आहे.
ब्रिटिशकाळापासून असलेल्या रेल्वे रुळाच्या नूतनीकरणाचे काम बडनेरा रेल्वे स्थानक परिसरातील अकोला ट्रॅकवर सुरू आहे. बऱ्याच ठिकाणी जुन्या ट्रॅकवर कठीण वळणे आहेत. या वळणावर प्रवासी गाड्या हळुवार चालवाव्या लागतात. त्याचप्रमाणे ट्रॅकला बरीच वर्षे झाल्यामुळे बडनेरा रेल्वे स्थानक परिसरात अलीकडच्या तीन वर्षांत रेल्वे इंजिन किंवा मालगाड्यांचे डबे रुळावरुन खाली घसरल्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्व गंभीर घटना आहेत. सुदैवाने या सर्व घटनांमध्ये कुठलीही प्राणहानी झालेली नाही. या सर्व बाबी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी नव्याने रेल्वे रुळ उभारण्याचे काम हाती घेतले आहे. एक महिन्यापासून बडनेऱ्यातच रेल्वे रुळ तयार करण्याचे काम करण्यात येत आहे. या रुळांना टी-२८ या अत्याधुनिक मशीनद्वारे बसविण्याचे काम सुरू झाले आहे तर जुने रुळ काढण्यात येत आहे. कठीण वळणांना सरळ रेल्वे ट्रॅक टाकून रेल्वे गाड्यांसाठी सुरळीत वाहतूक केली जाणार असल्याची माहिती आहे. बडनेऱ्यातून भरधाव रेल्वे प्रवासी गाड्या यापुढे कठीण वळणांचा अडथळा निर्माण होणार नसल्याचे समजते.