रेल्वे खलाशाचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 22:29 IST2018-10-22T22:29:31+5:302018-10-22T22:29:46+5:30
रेल्वे विभागात खलाशी पदावर कार्यरत असणाऱ्या तरुणाचा रेल्वेच्याच धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. अनूप उपेंद्र श्रीवास (३०,रा.खंडेलवालनगर) असे मृत रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे.

रेल्वे खलाशाचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रेल्वे विभागात खलाशी पदावर कार्यरत असणाऱ्या तरुणाचा रेल्वेच्याच धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. अनूप उपेंद्र श्रीवास (३०,रा.खंडेलवालनगर) असे मृत रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे.
अनूप श्रीवास पत्नी व तीन महिन्यांच्या मुलासह साईनगरस्थित खंडेलवाल नगरात राहत होता. अमरावती रेल्वेस्थानक येथे तो खलाशी पदावर कार्यरत होता. रविवारी रात्री अनूप हा महावीर नगरात दुर्गाेत्सव मंडळाच्या महाप्रसाद कार्यक्रमाकरिता गेला होता. कार्यक्रम आटोपून तो ड्युटीवर जाण्यासाठी रात्री उशिरा निघाला. दरम्यान अनूप हा सातुर्णाजवळील अंबा मंगलम् कार्यालयामागील रेल्वे रुळ ओलांडून सातुर्णा स्टॉपवर येत होते. दरम्यानच रेल्वे रुळ ओलांडताना अमरावतीहून बडनेराकडे जाणाऱ्या रेल्वेचा धक्का अनूपला लागला. अनूप घटनास्थळीच मृतावस्थेत पडून होता. याची माहिती रात्री १ वाजता राजापेठ पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन सामान्य रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात नेले.
सोमवारी सकाळी अनूपच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, त्याचे पार्थिव नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
कुटुंबीयांचा आक्रोश
अनूप हा आनंदी व सुस्वभावी असल्यामुळे त्याचे चाहते व मित्र मंडळीत तो आवडता होता. अनुप हा एकुलता एक असल्यामुळे कुटुंबीयांचा आधारवड होता. आई-वडिल, पत्नी एक तीन महिन्याचा मुलगा व तीन ते चार वर्षांची मुलगी असा अनूपचा परिवार आहे.
अनूपच्या मृत्यूमुळे श्रीवास कुटुंबीयांवर दुखाचे डोंगर कोसळले असून, अंत्यविधीवेळी कुटुंबीयांचा आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पाणावले होते. सोमवारी दुपारी त्याच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आले. याप्रकरणात राजापेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.