रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल, खिडक्यांवर ‘नो-रूम’
By Admin | Updated: March 29, 2017 00:07 IST2017-03-29T00:07:49+5:302017-03-29T00:07:49+5:30
लग्नप्रसंगांची धूम, शाळा- महाविद्यालयांच्या सुट्या यामुळे मे अखेरपर्यंत रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल आहेत.

रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल, खिडक्यांवर ‘नो-रूम’
अमरावती : लग्नप्रसंगांची धूम, शाळा- महाविद्यालयांच्या सुट्या यामुळे मे अखेरपर्यंत रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल आहेत. आरक्षण खिडक्यांवर लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी ‘नो-रूम’ असे फलक झळकत आहेत. त्यामुळे रेल्वेने प्रवास कसा करावा, ही विवंचना प्रवाशांना भेडसावत आहे.
दरवर्षी मार्च ते मे हे तीन महिने रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल असतात. यंदाही हीच परिस्थिती असून मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, चैन्नई, बंगळुरू व कोलकाता मार्गे ये-जा करणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये आरक्षण मिळणे दुरापास्त झाले आहे.
विशेषत: मुंबईकडे ये-जा करण्यासाठी भरपूर गाड्या असल्या तरी अमरावती-मुंबई एक्सप्रेस सतत हाऊसफुल्ल धावत असल्याचे दिसून येते.
मुंबईमार्गे हावडा-कोलकाता मेल, गीतांजली, शालीमार एक्सप्रेस तर हावडा-पुणे ज्ञानेश्वरी डिलक्स एक्सप्रेस या गाड्या दरदिवशी धावतात. परंतु रेल्वे गाड्यांमधील गर्दी ओसरण्याचे नाव घेत नाही. दहावीच्या परीक्षा आटोपताच मंगळवारपासून अमरावती, बडनेरा रेल्वे स्थानकावर गर्दी वाढल्याचे दिसून आले. मुंबई एक्सप्रेसमध्ये ६५० च्यावर ‘वेटिंग लिस्ट’ असल्याने मुंबईमार्गे प्रवास कसा करावा, ही चिंता नागरिकांना सतावू लागली आहे.
दोन महिने ‘वेटिंग’
अमरावती : अमरावती- मुंबई एक्सप्रेस, गोंदिया-मुंबई विदर्भ एक्सप्रेस, हावडा-मुंबई मेलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. विशेषत: मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई मार्गे ये-जा करण्यासाठी प्रवाशांकडून आरक्षणाची मागणी असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. भुसावळ-निजामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेसमध्येही मे महिन्यापर्यंत आरक्षण उपलब्ध नाही. एप्रिल व मे महिन्यात लग्नतारखा असल्याने अनेकांना रेल्वेऐवजी खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करण्याचे नियोजन करावे लागत आहे. मात्र ट्रॅव्हल्स संचालकांकडून तिकिटाचे अव्वाच्या सव्वा दर आकारले जात असल्याने प्रवाशांची लूट सुरु झाली आहे. खासगी बस संचालकांकडून पुणे प्रवासाचे दर मागील काही दिवसांपासून दुप्पट झाल्याची माहिती आहे. एप्रिल व मे हे दोन महिने ट्रॅव्हल्स संचालकांसाठी सुगीचे ठरणारे आहेत. काही दलालांनी रेल्वे गाड्यांचे आगाऊ आरक्षण करून ठेवले असून या तिकिटांची चढ्या दराने विक्री केली जात आहे.
मुंबई-दिल्ली-हावडा मार्गे ये- जा करणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये एप्रिल व मे महिन्यात आरक्षण मिळणे कठीण आहे. दहावीची परीक्षा आटोपल्याने गाड्यांमध्ये गर्दी वाढली आहे. ही परिस्थिती १५ जूनपर्यंत कायम राहिल.
- डी.व्ही. धकाते,
आरक्षण पर्यवेक्षक, अमरावती.