लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आपल्या हद्दीतील हॉटेल 'किचन ३६५' वर ६ फेब्रुवारीच्या रात्री राजापेठ पोलिसांनी धाड टाकली. हॉटेलमालक महेश छाबडावर गुन्हाही नोंदविला. मात्र लाखो रुपयांची उलाढाल असणाऱ्या या अड्ड्यावरून पोलिसांनी केवळ १३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, ते कुणाच्याही पचनी पडले नाही. तर दुसरीकडे धुवांधार बॅटिंग करणाऱ्या क्राईम प्रमुख संदीप चव्हान यांना तेथील अवैध व्यवसाय दिसत नाहीत काय, यासह छाबडाला कुणाचा वरदहस्त हा प्रश्नदेखील चर्चिला जात आहे.
हॉटेल मालक महेश छाबडा हा राजरोसपणे अवैध हुक्का पार्लर चालवत असल्याचे जगजाहीर आहे. मात्र, त्याच्यावर कारवाई करण्याचे धाडस स्थानिक पोलिस दाखवू शकत नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे छाबडाचा असलेला 'वरदहस्त'. पीआय दर्जाच्या अधिकाऱ्यांना तर तो जुमानतच नाही, उलट एसीपी आणि डीसीपी स्तरावरील अधिकाऱ्यांशी माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत, असा तो उघड दावा करतो.
'नौ सौ चूहे खाकर बिल्ली चली हज को'
नवीनचंद्र रेड्डी सीपी असताना याच महेश छाबडाने होळीवेळी हॉटेल आणि ढाब्यांवर अवैध दारूविक्री होऊ नये, अशा आशयाचे निवेदन आयुक्तांना दिले होते. पण, दुसऱ्याच दिवशी त्याच्या स्वतःच्या हॉटेलमध्ये अवैध दारूची बिनधास्त विक्री सुरू असल्याचे समोर आले होते. स्वतःचे पाप झाकण्यासाठी निवेदनाचे ढोंग रचणाऱ्या छाबडाचा खरा चेहरा आता उघडा पडला आहे. रात्री ३-४ वाजेपर्यंत या हॉटेलमध्ये छमछम चालते, अशी ओरड असतानाही पोलिस यंत्रणा कुंभकर्णी झोपेत का आहे? असा अमरावतीकरांचा सवाल आहे.
पालकमंत्र्यांची 'ती' भेट आणि पोलिसांची 'सलामी'
गेल्यावर्षी पालकमंत्र्यांनी या हॉटेलमध्ये अल्पोपहार केला होता. त्यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चक्क हॉटेलच्या दारात उभे राहून छाबडाच्या उपस्थितीत सलामी ठोकली होती. तेव्हापासून छाबडाची 'हवा' शहरात वाढली आहे. 'पोलिस आपल्या खिशात आहेत', अशा आविर्भावात वावरणाऱ्या या व्यक्तीला कायद्याचा धाक दाखवणार कोण? हाच खरा प्रश्न आहे.
आयुक्त साहेब, आता तरी 'बुलडोझर' फिरवा!
पोलिस आयुक्त राकेश ओला, गुन्हे शाखा प्रमुख संदीप चव्हाण आणि राजापेठचे ठाणेदार पुनीत कुलट या प्रकरणाची गंभीर दखल घेणार का? केवळ १३०० रुपयांच्या गुन्ह्याची नोंद करून छाबडाला मोकळे सोडण्यापेक्षा, त्याच्या हॉटेलची गुन्हेगारी 'हिस्ट्री' तपासावी. वारंवार होणारे उल्लंघन आणि अवैध धंदे पाहता, हॉटेल 'किचन ३६५' चा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावा, अशी मागणी आता जनतेतन जोर धरत आहे.
Web Summary : Amravati police raided a hookah parlor, seizing only ₹1300. Questions arise about possible favoritism towards the owner and police negligence despite blatant illegal activities. Locals demand action and license cancellation.
Web Summary : अमरावती पुलिस ने हुक्का पार्लर पर छापा मारा, केवल ₹1300 जब्त किए। मालिक के प्रति संभावित पक्षपात और स्पष्ट अवैध गतिविधियों के बावजूद पुलिस की लापरवाही पर सवाल उठते हैं। स्थानीय लोगों ने कार्रवाई और लाइसेंस रद्द करने की मांग की।