राहुल गांधी करणार १४ किलोमीटर पायदळ वारी
By Admin | Updated: April 29, 2015 00:14 IST2015-04-29T00:14:30+5:302015-04-29T00:14:30+5:30
खचलेल्या शेतकऱ्यांना मानसिक उभारी देण्याच्या हेतुने धामणगाव व चांदूररेल्वे तालुक्यातील एकूण आठ शेतकऱ्यांच्या..

राहुल गांधी करणार १४ किलोमीटर पायदळ वारी
जिल्हा प्रशासन सज्ज : आठ मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना देणार भेटी
अमरावती : खचलेल्या शेतकऱ्यांना मानसिक उभारी देण्याच्या हेतुने धामणगाव व चांदूररेल्वे तालुक्यातील एकूण आठ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी हे गुरुवार, दि ३० एप्रिल रोजी सांत्वनापर भेट देणार आहेत. यासाठी ते सुमारे १४ किमी पायदळ वारी करतील. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या अपेक्षाही यावेळी ते समजून घेतील.
धामणगाव तालुक्यातील गुंजी शहापूर आणि रामगाव या दोन गावांना तर चांदूररेल्वे तालुक्यातील राजना आणि टोंगलाबाद या दोन गावांना ते भेटी देतील.
धामणगाव तालुक्यातील गुंजी या गावातील निलेश वाळके आणि अंबादास वहिले, शहापूर येथील नामदेव कांबळे, रामगाव येथील कचरू तुपसुंदरे या मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे राहुल गांधी सांत्वन करतील.
चांदूररेल्वे तालुक्याच्या राजना गावातील मारोती नेवारे तसेच टोंगलाबाद येथील अशोक सातपैसे, रामदास आडकिने, माणिक ठवकर आणि शंकर आडकिणे या चार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना ते भेटतील.
यंदा दोन्ही हंगामातील धान्य शेतकऱ्यांच्या घरात आले नाही़ शासनाने शेतकऱ्यांना भरीव मदत देणे गरजेचे होते़ परंतु ही मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आत्महत्येचा पर्याय निवडला़ शेतकऱ्यांनी सन्मानाने जगावे या करीता राहुल गांधी यांचा दौरा आहे़
- वीरेंद्र जगताप, आमदार