विद्यापीठात रघुवंशी, मोहरील यांना पुन्हा ‘डीन’ची लॉटरी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:10 IST2021-06-01T04:10:49+5:302021-06-01T04:10:49+5:30
अधिष्ठात्यांना पुनर्नियुक्ती देण्याच्या हालचाली, २ जून रोजी कुलगुरू चांदेकर यांचा कार्यकाळ संपणार अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे विज्ञान ...

विद्यापीठात रघुवंशी, मोहरील यांना पुन्हा ‘डीन’ची लॉटरी?
अधिष्ठात्यांना पुनर्नियुक्ती देण्याच्या हालचाली, २ जून रोजी कुलगुरू चांदेकर यांचा कार्यकाळ संपणार
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता एफ.सी. रघुवंशी आणि मानव्य विज्ञान शाखेचे अविनाश मोहरील यांना ‘डीन’ पदावर पुन्हा नियुक्ती मिळण्याचे संकेत आहेत. मात्र, महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार ‘डीन’ यांना एक दिवसांसाठी तरी मूळ पदावर रूजू व्हावे लागते. या नियमावलींचे पालन होते की थेट पुनर्नियुक्ती दिली जाते, याकडे शिक्षण क्षेत्रातील सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
विद्यमान कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांचा कार्यकाळ २ जून रोजी संपुष्टात येणार आहे. परिणामी चांदेकर यांचा प्रभार अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्याकडे सोपविला जाणार आहेत. अधिष्ठातापदी एफ.सी. रघुवंशी व अविनाश मोहरील यांची त्याच दिवशी नव्या प्रभारी कुलगुरूंच्या हस्ते पुनर्नियुक्ती देण्याबाबातच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यापूर्वी विद्यापीठात कुलगुरू चांदेकर यांना निरोप देण्याच्या अनुषंगाने शिक्षण मंचच्यावतीने १ जून रोजी ऑनलाईन स्नेहबंध सोहळा होत आहे.
महाराष्ट्र विद्यापीठ कायदा कलम १५ (३) नुसार अधिष्ठात्यांचा पदावली हा कुलगुरूंच्या पदावधीइतका किंवा त्याचे नियत वयोमान पूर्ण होईपर्यंत, यापैकी जो अगोदर घडेल, इतका असतो. कुलगुरूंचा कार्यकाळ संपताच अधिष्ठांत्यांचाही कारभार संपतो, अशी नियमावली आहे. तथापि, नवीन अधिष्ठात्यांची यथोचित नियुक्ती होईपर्यंत नवीन कुलगुरूंना अधिष्ठात्यांची सेवा पुढे चालू ठेवता येते. मात्र, किमान एक दिवस तरी अधिष्ठात्यांना त्यांच्या मूळ नियुक्तीच्या ठिकाणी रुजू व्हावे लागते, अशी नियमावली आहे. आता विद्यापीठात रघुवंशी, मोहरील यांच्या अधिष्ठातापदाच्या पुनर्नियुक्तीबाबत काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
--------------
डॉ. विलास भाले असतील प्रभारी कुलगुरू
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू असतील. त्यांच्याकडे राज्यपालांनी प्रभारी कुलगुरुपदाची जबाबदारी सोपविल्याची माहिती आहे. किमान दोन महिने डॉ. भाले यांच्याकडे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची जबाबदारी असेल, असे संकेत आहेत.