दादासाहेबांच्या दर्शनासाठी रीघ

By Admin | Updated: July 27, 2015 00:21 IST2015-07-27T00:21:39+5:302015-07-27T00:21:39+5:30

पुष्पचक्र, हारार्पण करुन आपल्या लाडक्या नेत्याला कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी ‘अमर रहे, अमर रहे, दादासाहेब अमर रहे’ च्या घोषांनी आसमंत दणाणून गेला.

Ragh for Dada Saheb Darshan | दादासाहेबांच्या दर्शनासाठी रीघ

दादासाहेबांच्या दर्शनासाठी रीघ

अमरावती : पुष्पचक्र, हारार्पण करुन आपल्या लाडक्या नेत्याला कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी ‘अमर रहे, अमर रहे, दादासाहेब अमर रहे’ च्या घोषांनी आसमंत दणाणून गेला. दादासाहेबांच्या पार्थिवाजवळ त्यांच्या पत्नी कमलताई गवई, ज्येष्ठ सुपुत्र न्यायमूर्ती भूषण गवई, कनिष्ठ पुत्र राजेंद्र गवई, कन्या कीर्ती मेश्राम यांच्यासह करण, अर्जुन ही नातवंडे आवर्जून उपस्थित होते. दादांच्या अंतिम दर्शनासाठी आलेल्यांना कमलताई अभिवादन करीत असताना त्या दादासाहेबांच्या आठवणींनी गहिवरून रडत होत्या. अखेर दादासाहेबांची अंत्ययात्रा निघण्याची वेळ होताच भिख्खू संघाने सामूहिक बुद्धवंदना घेतली. त्यानंतर पोलिसांनी दादासाहेबांच्या पार्थिवावर राष्ट्रध्वज टाकून पार्थिवाला खांदा देत ते स्मृतीरथापर्यंत आणले. यावेळी भिख्खू संघाने बुद्धम् शरणम् गच्छामी, धम्मम् शरणम् गच्छामी, संघम् शरणम् गच्छामीने दादासाहेबांना ‘अलविदा’ केले. अंत्ययात्रा दारापूरच्या दिशने निघण्यापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री नितीन राऊत, आ. यशोमती ठाकूर, महापौर चरणजितकौर नंदा, माजी खा. नरेश पुगलिया, अनंत घारड, किशोर बोरकर, गुणवंत देवपारे, काँग्रेसचे पक्षनेता बबलू शेखावत, स्थायी समिती सभापती विलास इंगोले, राष्ट्रवादी फ्रंटचे गटनेता अविनाश मार्डीकर, माजी आ. नरेशचंद्र ठाकरे आदिंनी दादासाहेबांचे अंतिम दर्शन घेत धर्मनिरपेक्ष विचारसणीचा वसा जपणाऱ्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर अंत्ययात्रेला प्रारंभ करण्यात आला. दादासाहेबांचे पार्थिव घेऊन निघालेल्या रथावर पालकमंत्री प्रवीण पोटे, न्यायमूर्ती भूषण गवई, राजेंद्र गवई, रामेश्वर अभ्यंकर, अमोल तरोडकर, करण मेश्राम आदी होते. काँग्रेसनगरातून निघालेली अंत्ययात्रा पुढे रुख्मिणीनगर, हमालपुरा, जयस्तंभ चौक होत इर्विन चौकात काही वेळ थांबली. दादासाहेबांची अंत्ययात्रा इर्विन चौकात येणार असल्याने कार्यकर्ते, चाहत्यांनी दर्शनासाठी एकच गर्दी गेली होती. आंबेडकरी चळवळीला कायम प्रेरणा देणाऱ्या इर्विन चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला न्यायमूर्ती भूषण गवई, आ. रवी राणा, रिपाइंचे शहराध्यक्ष भूषण बनसोड यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. दरम्यान जमलेल्या हजारो लोकांनी दादासाहेबांच्या पार्थिवावर पुष्प अर्पण करून त्यांचे दर्शन घेतले. यावेळी ‘दादासाहेब अमर रहे’ च्या जयघोषांनी आसमंत दणाणून गेला. दरम्यान रिपाइंचे नेते खा. रामदास आठवले, माजी केंद्रिय मंत्री प्रफुल्ल पटेल, सुलेखा कुंभारे, माजी आ. अनिल गोडांणे, प्रदेशाध्यक्ष भुपेश थुलकर, गटनेता प्रकाश बनसोड, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप दंदे, ओमप्रकाश बनसोड हेदेखील इर्विन चौकात पोहोचले. दादासाहेबांच्या पार्थिवावर त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून दर्शन घेतले. त्यानंतर ही अंत्ययात्रा दारापूरच्या दिशेने निघाली असता स्थानिक गाडगेनगर स्थित संत गाडगेबाबांच्या समाधीस्थळी दर्शन घेण्यात आले. यावेळी दादासाहेबांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने महिला, पुरुष जमले होते. पुढे शेगाव नाका, नवसारी, वलगाव येथेसुद्धा समर्थक, चाहत्यांनी दादासाहेबांचे दर्शन घेत त्यांना अखेरचा निरोप दिला. अंत्ययात्रेत सर्व जाती धर्माचे लोक सहभागी झाले होते. रा. सू. गवई यांच्या अंतिम दर्शनासाठी रविवारी सकाळपासूनच काँग्रेसनगर येथील निवासस्थानी चाहते व कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी जमली होती.
यावेळी चंद्रकांत हंडोरे, वसुधाताई देशमुख, अविनाश मार्डीकर, आनंद शिंदे, अरुण वानखडे, बबलू शेखावत, विलास इंगोले, आर. मुगम, मेघनाथ अरोरा, वसंतराव साऊरकर, संजय तिरथकर, दीपमाला मोहोड, अजय गोंडाणे, प्रवीण मनोहर, बाबुसेठ खंडेलवाल, बी. आर. वाघमारे, मिलिंद बांबल, नगरसेवक प्रदीप बाजड, प्रदीप हिवसे, धीरज हिवसे, अरुण जयस्वाल, अमोल ठाकरे, समाधान वानखडे, उत्तमराव भैसने, कांचनमाला गावंडे, वंदना हरणे, मंगेश मनोहरे, ममता आवारे, नीलिमा काळे, प्रमोद गवई, सतीश भालेराव, प्रकाश दातार, पंकज मेश्राम आदींनी दादासाहेबांचे अंतिम दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली.

Web Title: Ragh for Dada Saheb Darshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.