परतवाडा बस स्थानकासमोर खासगी बसचालकांचा राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:14 IST2021-03-10T04:14:39+5:302021-03-10T04:14:39+5:30

फोटो पी ०९ परतवाडा फोल्डरमध्ये परतवाडा : स्थानिक एसटी बस स्थानकासमोर खासगी बसचालकांनी राडा घातला. यात प्रचंड दगडफेकही करण्यात ...

Radha of private bus drivers in front of Paratwada bus stand | परतवाडा बस स्थानकासमोर खासगी बसचालकांचा राडा

परतवाडा बस स्थानकासमोर खासगी बसचालकांचा राडा

फोटो पी ०९ परतवाडा फोल्डरमध्ये

परतवाडा : स्थानिक एसटी बस स्थानकासमोर खासगी बसचालकांनी राडा घातला. यात प्रचंड दगडफेकही करण्यात आली. दगडफेकीत ट्रॅव्हल्सच्या, खाजगी बसच्या काचाही फुटल्या. दरम्यान, दोन प्रवासी जखमी झाले. या राड्यात जवळपास अर्धा तास एसटीची चाके थांबली होती.

याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी शेख कलीम यांच्या तक्रारीवरून राजेश व नीलेश भोंडे या भावंडाविरुद्ध भादंविचे कलम ३३६, ४२७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. ९ मार्चला सकाळी ८.३० च्या दरम्यान प्रवासी व शेड्यूलवरून खाजगी बसचालकांच्या समर्थकांमध्ये वाद उपस्थित झाला. यात लागलीच खाजगी बसमालकांनीही हस्तक्षेप करीत वाद वाढवला. खाजगी बस एसटी बस स्थानकाच्या मार्गावर आडवी करण्यात आल्यानंतर दगडफेकही सुरू झाली. यात अन्य खाजगी बसच्या काचा फोडल्या गेल्या. जवळपास २० मिनिटे ही धुमश्चक्री चालली. खासगी बसमधील दोन प्रवासी जखमी झाले आणि तेथील गोंधळ पाहून निघून गेले. एसटी बसलाही या गोंधळ घालणाऱ्यांनी स्थानकाबाहेर पडू दिले नाही. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांशीही वाद घातला. राडा केल्यानंतर ही मंडळी परतवाडा पोलीस ठाण्यात पोहोचली. तेथे त्यांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या.

दरम्यान, एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनीही या खासगी बसगाड्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, खासगी वाहनधारक ‘नो पार्किंग झोन’चे पालन करीत नाहीत. दोनशे मीटरच्या आत येऊन अगदी बस स्थानकातून, त्यापुढून प्रवासी नेतात. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांशी वाद घालतात,

राजकीय हस्तक्षेप आणि पोलिसांच्या संगनमताने बस स्थानकासमोरच नव्हे, तर शहरात अवैध प्रवासी वाहतुकीचा अवैध व्यवसाय चांगलाच फोफावला आहे.

बॉक्स

नागरिकांची सुरक्षा धोक्यात

अगदी दोनशे मीटरच्या आत ‘नो पार्किंग झोन’मध्ये मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूंनी या खासगी बस व प्रवासी वाहतूक करणारी लहान-मोठी वाहने गर्दी करून उभी असतात. वाहतूकही जाम करतात. वाहतूक पोलीस हे दृश्य उघड्या डोळ्यांनी बघत असतात. यात अनियंत्रित ऑटोरिक्षांची भर पडत आहे. बघ्याची भूूमिका घेण्याइतपत या पोलिसांचे हात नेमके कुणी बांधले, यावर आता मोठ्या प्रमाणात चर्चा रंगत आहेत.

बॉक्स

डझनभर तक्रारी

एसटी महामंडळाकडून या खासगी प्रवासी वाहनांविरोधात आतापर्यंत डझनभर तक्रारी पोलिसांकडे दिल्या आहेत. पण, या तक्रारींची दखलही पोलिसांना घ्यावीशी वाटलेली नाही. महामंडळाच्या तक्रारींना पोलिसांनी कचऱ्याची टोपली दाखवली आहे.

बॉक्स

शहरात सर्वत्र अनियंत्रित वाहतूक

शहरात सर्वत्र अनियंत्रित वाहतूक फोफावली आहे. शहरात काही ठिकाणी वाहतूक पोलीस बघायला मिळतात. ते कुठे तरी सावलीत गप्पा मारत राहतात. या वाहतूक पोलिसांचे एका ठिकाणी बूडच टेकत नाही. एखाद्या वाहनधारकाने विचारलेच, तर काय करावे जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आदेश आहेत, असे सांगितले जाते.

Web Title: Radha of private bus drivers in front of Paratwada bus stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.