बाजार समितीत राडा; तीन तास काम बंद
By Admin | Updated: March 12, 2016 00:05 IST2016-03-12T00:05:19+5:302016-03-12T00:05:19+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत अडत्याकडून हमालास पट्ट्याने मारहाण झाल्याप्रकरणी हमाल, मापारी ...

बाजार समितीत राडा; तीन तास काम बंद
अडत्यांकडून हमालास पट्ट्याने मारहाण : पोलिसात परस्परविरोधी तक्रार, दोन दिवसांनंतर होणार कारवाई
अमरावती : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत अडत्याकडून हमालास पट्ट्याने मारहाण झाल्याप्रकरणी हमाल, मापारी संघटनांनी शुक्रवारी कामबंद आंदोलन पुकारले. परिणामी बाजार समितीचे कामकाज तीन तास ठप्प झाले. अखेर दोन दिवसांनंतर मारहाण करणाऱ्या अडत्यावर ठोस कारवाई केली जाणार, या प्रशासनाच्या आश्वासनानंतर हमालांनी पुकारलेले कामबंद आंदोलन शेतकरी हितासाठी मागे घेण्यात आले. याप्रकरणी पोलिसात परस्परविरोधी तक्रारी करण्यात आल्या आहेत.
रावसाहेब लोभाजी दळवी (५५ रा. संतोषीनगर, अमरावती) हे बाजार समितीत ओमप्रकाश मुंदडा या अडत्याकडे हमालीचे काम करतात. नेहमीप्रमाणे रावसाहेब दळवी हे शेतीमाल घेऊन आलेले वाहन उभे करून त्यातील माल काढण्याची तयारी करीत होते.
मधस्थी करणाऱ्यासही फटका
अडते गोविंद टवानी हे रावसाहेब दळवी यांना पट्ट्याने मारहाण करीत असल्याचे बघून मधस्थी करण्यास गेलेले शकील शाह खलीद शाह या हमालासदेखील पट्ट्याचा तोंडावर मार बसला, हे त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. शकील शाह यांच्या तोंडावर मार लागल्याचे दिसून आले.
पोलिसात परस्परविरोधी गुन्हे दाखल
कृषी उत्पन्न बाजार समितीत हमालास पट्ट्याने मारहाण झाल्याप्रकरणी गाडगेनगर पोलिसात परस्परविरोधी तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. रावसाहेब दळवी यांना पट्ट्याने मारहाण केल्याप्रकरणी त्यांची वैद्यकीय तपासणी केली आहे. तसेच गोविंद टवानी व बाळू वानखडे या अडत्यानेदेखील हमालांनी हुकने वार केल्याची तक्रार दिली आहे. तक्रारीच्या आधारे गाडगेनगर पोलिसांनी भादंविच्या कलम १६० अन्वये गुन्हे दाखल केले आहे.
बाजार समिती सभापती मुंबईला
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील वऱ्हाडे हे वैद्यकीय उपचारासाठी मुंबईला असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र बाजार समितीत अडते, हमालांमध्ये झालेल्या वादावर ते मुंबईहून लक्ष ठेवून होते. त्यामुळे हा वाद विकोपाला जाऊ नये, यासाठी उपसभापतींसह काही संचालकांना त्यांनी बाजार समितीत पाठवून तोडगा काढण्यासाठी पाठविले होते, अशी माहिती आहे.
हमालास मारहाणीची घटना निंदनीय आहे. मात्र शेतकरी हितासाठी बाजार समितीचे कामकाज बंद ठेवणे योग्य नाही. त्यामुळे सभापती परत येताच संबंधित अडत्यांवर दोन दिवसांत कारवाई केली जाईल.
- बंडू वानखडे,
संचालक, बाजार समिती
व्यापारी आणि हमालांच्या आपसी समझोत्याने तोडगा निघाला आहे. यापुढे असा प्रकार होणार नाही, याबाबत समज देण्यात आली आहे. बाजार समितीचे कामकाज नियमित सुरू झाले आहे.
- सतीश अट्टल,
संचालक, बाजार समिती