जातीच्या दाखल्यासाठी उमेदवारांची धावपळ
By Admin | Updated: November 3, 2016 00:17 IST2016-11-03T00:17:26+5:302016-11-03T00:17:26+5:30
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर इच्छूक उमेदवारांची जातीचे दाखले मिळविण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.

जातीच्या दाखल्यासाठी उमेदवारांची धावपळ
निवडणुकीची चाहूल : विविध ठिकाणच्या सेतू केंद्रांवर इच्छुकांची वाढत आहे गर्दी
अमरावती: आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर इच्छूक उमेदवारांची जातीचे दाखले मिळविण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी असलेल्या सेतू केंद्रावर यासाठीचे अर्ज येण्याचे प्रमाण वाढले आहे.
येत्या जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यासाठी वरील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे आरक्षणसुध्दा काढण्यात आले आहे. यात जिल्हा परिषदेच्या गटासाठी, तर पंचायत समितीच्या गणाकरीता आणि महापालिकेच्या प्रभागासाठी आरक्षण सोडत काढली आहे. त्यामुळे आरक्षित जागेवर निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेले उमेदवारांनी निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर नागरी सुविधा केंद्रावर जातीचे दाखले काढण्यासाठी दस्ताऐवजाची जुळवाजुळव आणि प्रशासकीय सोपस्कार करण्याचे दृष्टीेने धावपळ सुरू केले असल्याचे दिसून येत आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणेनेसुध्दा नियोजन करण्याचे दृष्टीने तयारी केली आहे. महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या आरक्षण सोडतीमध्ये अनेक खुल्या गटातील इच्छुकांच्या जागांवर इतर मागास वर्गाचे (ओबीसी) आरक्षण पडले आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी आता जातीचा दाखला मिळविण्यासाठी ६० वर्षापेक्षा अधिक वर्षाचे पुरावे सादर करणे आवश्यक असते. जुने पुरावे मिळविण्यासाठी तहसील कार्यालयात इच्छुकांची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)