रबी पीककर्ज वाटप; बँकांचा असहकार
By Admin | Updated: January 3, 2015 22:52 IST2015-01-03T22:52:44+5:302015-01-03T22:52:44+5:30
खरीप हंगामातील नापिकीने हवालदिल शेतकऱ्यांना रबी पेरणीसाठी पीककर्ज वाटपात बँकांनी हात आखडता घेतला आहे. २० डिसेंबर २०१४ पर्यंत शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेने

रबी पीककर्ज वाटप; बँकांचा असहकार
सहकारी बँकेचा भोपळा : उद्दिष्ट्यपूर्तीलाच ‘खो’, शेतकरी आर्थिक संकटात
गजानन मोहोड - अमरावती
खरीप हंगामातील नापिकीने हवालदिल शेतकऱ्यांना रबी पेरणीसाठी पीककर्ज वाटपात बँकांनी हात आखडता घेतला आहे. २० डिसेंबर २०१४ पर्यंत शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेने एकाही शेतकऱ्याला पीक कर्ज दिलेले नाही. तर राष्ट्रीयीकृत बँकांनी देखील रबी पीक कर्जाच्या उद्दिष्ट्यपूर्तीला ‘खो’ दिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. पीक कर्जाच्या उद्दिष्टासाठी निर्धारित जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँका व ग्रामीण बँकांनी रबीसाठी केवळ ७ टक्केच कर्जवाटप केले आहे.
यंदाच्या रबी हंगामासाठी जिल्ह्याला ३५० कोटी ८२ लक्ष रूपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु २० डिसेंबर २०१४ पर्यंत राष्ट्रीयीकृत बँका व ग्रामीण बँकांनी २ हजार ४२६ शेतकरी सभासदांना केवळ ४३ कोटी १८ लाख रूपयांच्या पीककर्जाचे वाटप केले आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एकाही शेतकरी सभासदाला रबी पिकासाठी कर्ज दिले नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. हे कर्जवाटप ‘टार्गेट’च्या केवळ ७ टक्के इतकेच आहे. तुलनेत खरीप पीककर्ज वाटप उद्दिष्टाच्या ७१ टक्के करण्यात आले होते. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती शेतकरी सहकारी बँकेने ५८,४८५ शेतकऱ्यांना ४३४ कोटी ९३ लक्ष ८७ हजारांचे पीककर्ज वाटप केले. हे वाटप उद्दिष्टाच्या ९१ टक्के इतके आहे. राष्ट्रीयीकृत बँकांनी ६१ हजार २७८ शेतकऱ्यांना ६७८ कोटी ३३ लक्ष रूपयांचे कर्जवाटप केले. हे वाटप उद्दिष्टाच्या ६३ टक्के आहे.
तर जिल्ह्यातील ग्रामीण बँकांनी ८०० शेतकऱ्यांना ७ कोटी १२ लाख रूपयांचे कर्जवाटप केले. हे कर्जवाटप उद्दिष्टयाच्या ९२ टक्के होते. यंदा पीककर्ज वाटप करण्यात न आल्याने शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे.