महापालिकेच्या आमसभेत ‘कालबाह्य’ प्रस्तावांचा रतीब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2016 01:08 IST2016-07-13T01:08:27+5:302016-07-13T01:08:27+5:30
महापालिकेच्या मासिक आमसभेत कार्यक्रम पत्रिकेत कालबाह्य प्रस्तावांचा रतीब घालण्यात आल्याने लोकाभिमुख प्रश्नांना ‘वाचाच’ फुटत नसल्याचे वास्तव आहे.

महापालिकेच्या आमसभेत ‘कालबाह्य’ प्रस्तावांचा रतीब
प्रशासनाकडून हवी उपाययोजना : सांघिक प्रयत्नांची गरज
अमरावती : महापालिकेच्या मासिक आमसभेत कार्यक्रम पत्रिकेत कालबाह्य प्रस्तावांचा रतीब घालण्यात आल्याने लोकाभिमुख प्रश्नांना ‘वाचाच’ फुटत नसल्याचे वास्तव आहे. कधी एखाद्या विषयावर शाब्दिक चकमक तर दुसऱ्या विषयावर कुणाचे तरी बहिर्गमन होत असल्याने कार्यक्रम पत्रिकेची जाडी वाढू लागली आहे. या कार्यक्रम पत्रिकेतील कालबाह्य झालेले प्रस्ताव काढून टाकावेत व ही कार्यक्रमपत्रिका फ्रेश करावी, अशी मागणी बहुतांश नगरसेवकांमधून होत आहे.
नगरसेवकांनी दोन वर्षापूर्वी टाकलेल्या प्रस्तावांवर आमसभेमध्ये चर्चाच न झाल्याने ते प्रस्तावच आता कालबाह्य ठरू लागले आहेत. मात्र ते अद्यापही कार्यक्रम पत्रिकेवर कायम असल्याने दिवसेंदिवस प्रस्तावांच्या संख्येतच भर पडत आहे. गतवर्षी आॅगस्टमध्ये एलबीटी प्रणाली हद्दपार झाली असताना भाजपच्या संजय अग्रवालांचा प्रश्न १९ एप्रिल २०१४ पासून कार्यक्रम पत्रिकेत आहे. १ एप्रिल २०१४ पासून स्थानिक संस्था कराच्या दराबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी २०१६ चा जुलै उजाडला, एलबीटी रद्द झाली.
मात्र हा प्रश्न ‘जैसे थे’ आहे. बहुतांश नगरसेवकांना दोन वर्षापूर्वी टाकलेल्या प्रस्तावांवर उत्तरच मिळालेले नसल्याने चर्चा न झाल्याने ते प्रस्ताव कायम आहेत. विद्यमान नगरसेवकांचा सहा महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक असताना पुढील आमसभांमध्येही हे प्रस्ताव निकाली निघण्याची अजिबातच शक्यता नाही, त्यामुळे सार्वत्रिक निवडणुकीनंतरही ते रखडलेले प्रस्ताव कार्यक्रम पत्रिकेची जाडी वाढवतील की काय, अशी अनेक नगरसेवकांना भीती आहे. याशिवाय स्थानिक संस्था कराबाबतचे बहुतांश प्रस्ताव आता कालबाह्य ठरले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील जागा १४ एप्रिल २०१५ पूर्वी अधिग्रहीत करून त्याठिकाणी सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव असाच धुळखात बसला आहे. १४ एप्रिल २०१६ निघून गेल्यानंतरही पालिकेच्या आमसभेत या प्रस्तावावर चर्चा होऊ शकली नाही, हे वास्तव आहे. (प्रतिनिधी)
बडनेऱ्यात टँकर पोहोचेना
२० मार्च २०१५ च्या सर्वसाधारण सभेत बडनेरा शहरातील पाणीटंचाईवरील उपाययोजनेसंदर्भात काँग्रेसच्या कांचन ग्रेसपुंजे यांनी प्रस्ताव टाकला होता. आॅगस्ट २०१४ मध्ये बडनेरा शहरासाठी पिण्याच्या पाण्याचा टँकर देण्यात आला परंतु अजूनपर्यंत सुरू न केल्याबाबत चर्चा करून निर्णय घेणे, असा तो प्रस्ताव होता. दीड वर्षे उलटूनही या प्रस्तावावर चर्चा न झाल्याने हा प्रस्तावच कालबाह्य ठरला आहे. आमसभेत प्रस्तावांवरील होणारी लांबलचक चर्चा पाहता पुढील उन्हाळ्यात तरी ग्रेसपुंजेंना त्यांच्या प्रस्तावाचे उत्तर मिळेल का, याबाबत त्याही साशंक असतील.
एकच प्रस्ताव दोनदा
नगरसेवकांनी आमसभेमध्ये ठेवलेला प्रस्ताव वर्षोगिणती चर्चेसाठी येत नसल्याने काही नगरसेवकांना जुनाच प्रश्न रिपिट करावा लागतो. त्यामुळे उगाचाच कार्यक्रम पत्रिकेची लांबी वाढते. कार्यक्रम पत्रिकेत चार-सहा महिन्यांच्या कालावधीनंतर अनेक प्रस्ताव पुन्हा मांडण्याचा प्रयत्न नगरसेवक करतात. मात्र प्रशासनाकडून त्यांच्या प्रस्तावाला उत्तरच मिळत नाही.