गोवंश हत्याबंदीचा कुरेशी समाजाचा निर्णय
By Admin | Updated: March 14, 2015 00:36 IST2015-03-14T00:36:50+5:302015-03-14T00:36:50+5:30
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या स्वाक्षरीने अध्यादेश जारी करुन देशात गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आला आहे.

गोवंश हत्याबंदीचा कुरेशी समाजाचा निर्णय
लोकमत विशेष
गणेश वासनिक अमरावती
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या स्वाक्षरीने अध्यादेश जारी करुन देशात गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने कुरेशी समाजाने १६ मार्च सोमवारपासून जनावरांची कत्तल बंद करुन मांसविक्रीवर लगाम लावण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र शासनाने गोवंश हत्याबंदी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाला आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्यशासनाने राष्ट्रपतींच्या अध्यादेशाचा दाखला देत गोवंश हत्याबंदी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पोलीस प्रशासनाला आवश्यक उपाययोजना करण्याचे कळविले आहे. गोवंश हत्याबंदीच्या अध्यादेशावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी करताच जनावरांच्या मांसविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या कुरेशी समाजाने बैठक घेऊन यापुढे पशुंच्या बाजारातून बैल, गाई आणि या प्रजातीतील जनावरांची खरेदी करु नये, असे ठरविले होते.
या निर्णयाची मांसविक्रेत्यांनी अंमलबजावणी करावी, यासाठी गेल्या आठवड्यात चांदूरबाजार तर शुक्रवारी बडनेऱ्यातील गुरांच्या बाजारात जाऊन अल जमेतूल कुरेशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरांची खरेदी करण्यास मज्जाव केला. मांस विक्रत्यांनी गुरांची खरेदी थांबविल्याने पशुपालकांनी विक्रीकरीता आणलेली गुरे आल्या पावली परत न्यावी लागली. गोवंश हत्याबंदी कायद्यात गुरांची हत्या किंवा मांसविक्री करताना कोणी आढळल्यास पाच वर्षे शिक्षेची तरतूद आहे. कुरेशी समाजाच्या या पुढाकाराची प्रशंसा होत आहे.