विद्यार्थ्यांसमवेतच्या 'सेल्फी'वर प्रश्नचिन्ह
By Admin | Updated: January 10, 2017 00:32 IST2017-01-10T00:32:42+5:302017-01-10T00:32:42+5:30
शाळेच्या हजेरी पटावरील बोगसपण रोखण्यासाठी शिक्षण मंत्र्यांनी घोषित केलेली 'सेल्फी वुईथ स्टुंडन्ट' योजनेला प्रारंभ होण्यापूर्वीच गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

विद्यार्थ्यांसमवेतच्या 'सेल्फी'वर प्रश्नचिन्ह
अंमलबजावणी : योजना सुरू करण्याचे वरिष्ठांचे आदेश
अमरावती : शाळेच्या हजेरी पटावरील बोगसपण रोखण्यासाठी शिक्षण मंत्र्यांनी घोषित केलेली 'सेल्फी वुईथ स्टुंडन्ट' योजनेला प्रारंभ होण्यापूर्वीच गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. सोमवारपासून १ ली ते १२ वीपर्यंतच्या सर्व वर्गात ही योजना सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. याची अंमलबजावणी सरल प्रणालीतून करावयाची आहे. त्याबाबत कोणत्याही मागदर्शक सूचना न आल्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. आधार क्रमांक लिंक करावयाचा असताना त्याची कोणतीही माहिती शिक्षण विभागाकडून उपलब्ध होत नसल्यामुळे त्याच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मागील नोव्हेंबरमध्ये राज्याचे शिक्षणमंत्र्यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमवेत सेल्फी काढून ती शासनाच्या वेबसाईटवर 'अपलोड' करावा, असे आदेश काढले होते. शिक्षणमंत्र्यांच्या या उपक्रमावर चोहोबाजूंनी टीका झाली तरीदेखील शिक्षणमंत्र्यांनी हा निर्णय रेटला आहे. सोमवारपासून हा उपक्रम सुरू करण्याचे आदेश देण्आच आले आहेत. पण या योजनेच्या अंमलबजावणीच्या आणि वापरासंदर्भात कोणत्याही मार्गदर्शक सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे सध्या शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शासनाच्या ज्या सरल वेबसाईटवर हे फोटो अपलोड करावयाचे आहेत, त्या प्रणालीमध्येच मुळात नेटवर्कचे दोष आहेत. याचे निराकरण झालेले नाही. या उपक्रमाच्या ट्रायल करताना फोटो अपलोड करताना चक्क एक दिवस गेल्याचा अनुभव शिक्षकांना आला आहे. ग्रामीण भागामध्ये इंटरनेटचे कनेक्शनच्या सिग्नलच्या अडचणीसह सर्वात मोठी अडचण आधार कार्डाच्या जोडणीच्यासंदभार्तील तयार झाली आहे. १ ली ते १२ वी पर्यंतच्या सर्व मुलांचे आधार कार्ड या सरल प्रणालीला आधी जोडावे लागणार आहेत. याची जोडणी झाल्यानंतरच संबंधिताचे फोटो काढल्यानंतर ते या लिकंशी जोडले जाणार आहेत. आधार नंबर नसेल तर ही जोडणी करणे शक्य होणार नाही. १ ली ते १२ वीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक असतील असे नाही. तसेच या मधल्या काळात हे क्रमांक जोडण्याचा वेग पाहता अजून काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या उपक्रमाची अंमलबजावणी कशी करायची, असा प्रश्न पडला आहे. दरम्यान यासंदर्भात जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभाागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य शासनाकडून अजून सूचना आलेल्या नसल्याचे स्पष्ट केले. याला म.रा.प्राथमिक शिक्षक समितीने १९ नोहेंबला मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देऊन केला होता. शिक्षणमंत्री व वरिष्ठ अधिकारी यांचा सेल्फी घेण्याबाबतचा अट्टाहास का? शाळांना संगणक व इतर सोई उपलब्ध नाहीत, त्या प्रथम द्याव्यात, अशी मागणीसुध्दा शिक्षक समितीने केली आहे. (प्रतिनिधी)