गुणवत्ता यादीनुसार होणार मॅनेजमेंट कोट्यातील प्रवेश

By Admin | Updated: May 30, 2016 00:43 IST2016-05-30T00:43:47+5:302016-05-30T00:43:47+5:30

राज्यातील केंद्रिभूत व संस्थास्तरावरील प्रवेश गुणवत्ता यादीतील क्रमांकाच्या आधारे होणार आहेत.

Quality quota will be done according to management quota admission | गुणवत्ता यादीनुसार होणार मॅनेजमेंट कोट्यातील प्रवेश

गुणवत्ता यादीनुसार होणार मॅनेजमेंट कोट्यातील प्रवेश

पत्रपरिषदेत माहिती : महाविद्यालयीन मनमानी कारभाराला चाप !
अमरावती : राज्यातील केंद्रिभूत व संस्थास्तरावरील प्रवेश गुणवत्ता यादीतील क्रमांकाच्या आधारे होणार आहेत. या सुधारणेमुळे महाविद्यालय तथा व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराला चाप लागणार आहे.
राज्य शासनाने मागील वर्षी महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था अधिनियम २०१५ पारित केला. त्यातील तरतुदीनुसार आता प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल, अशी माहिती शनिवारी पत्रपरिषदेतून तंत्र शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक दयानंद मेश्राम यांनी दिली.
तंत्र शिक्षण अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०१६-१७ संदर्भात प्रवेश प्रक्रिया नियमांची माहिती देण्यासाठी शनिवारी पत्रपरिषद घेण्यात आली. या कायद्यानुसार सर्व पदवी व पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा अनिवार्य आहे. संस्था स्तरावरील प्रवेशाव्यक्तिरिक्त सर्व प्रवेश केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून आयुक्तांच्या देखरेखीत होणार आहेत.
या नवीन कायद्यात प्रवेश प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने गुणवत्तेच्या आधारे व केंद्रिभूत पद्धतीने करण्याबाबतची तरतूद आहे. त्यातील सर्वात महत्त्वाच्या तरतुदीत मॅनेजमेंट कोट्यातील प्रवेश तंत्रशिक्षण विभागातर्फे राज्यात जाहीर केलेल्या गुणवत्ता यादीनुसार दिले जाणार आहे. महाराष्ट्रात अभियांत्रिकीचे ३६७ महाविद्यालये असून आता विद्यार्थ्यांना कोठूनही आॅनलाईन अर्ज सादर करून प्रवेश निश्चित करता येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दोन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. त्यामध्ये सुविधा केंद्रात आवेदनपत्रासंबधातील सामग्रीची विक्री, संगणकीय पद्धतीने कागदपत्रांची पडताळणी, अर्ज भरण े(आॅनलाईन) व तक्रारीचे निवारण करणे यासारख्या सुविधा पुरविल्या जाणार आहे, तर प्रवेश उपस्थिती केंद्रात उमेदवारांच्या प्रवेशाबाबतची कागदपत्रे स्वीकारली जातील. तसेच आवश्यक शुल्क भरणा करून प्रवेश निश्चित करण्यात येणार आहे.
अमरावती विभागात असे २६ केंद्र स्थापन करण्यात आली असून विद्यार्थ्यांना प्रवेशासंबंधित मार्गदर्शनसुद्धा मिळणार आहे. याव्यतिरिक्त कायद्यातील अन्य तरतुदीनुसार प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे, अशी माहिती पत्रपरिषदेतून दयानंद मेश्राम यांनी दिली. पत्रपरिषदेला अमरावती विभागाचे तंत्रशिक्षण सहसंचालक डी.एन. शिंगाडे, सहायक संचालक एम.ए. अली, प्रवेश प्रकिया अधिकारी जी.जी. सराटे व एस.पी. बाजड यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

Web Title: Quality quota will be done according to management quota admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.