महापालिकेत गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव
By Admin | Updated: July 2, 2015 00:17 IST2015-07-02T00:17:34+5:302015-07-02T00:17:34+5:30
महापालिकेच्या वतीने शहरातील इयत्ता १० व १२ वीत गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा बुधवारी पार पडला.

महापालिकेत गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव
पाल्यांचाही सत्कार : जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती
अमरावती : महापालिकेच्या वतीने शहरातील इयत्ता १० व १२ वीत गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा बुधवारी पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडलेल्या गुणगौरव समारंभाप्रसंगी मंचावर जिल्हाधिकारी किरण गित्ते, महापौर चरणजितकौर नंदा, आयुक्त चंद्रकांत गुडेवार, स्थायी समितीचे सभापती विलास इंगोले, पक्षनेता बबलू शेखावत, विरोधी पक्षनेता प्रवीण हरमकर, गटनेता अविनाश मार्डीकर, दिंगबर डहाके, शिक्षण समिती सभापती अब्दुल रफिक, उपसभापती मो. इमरान अशरफी, झोन क्रमांक २ चे सभापती मिलींद बांबल, शहर सुधार सभापती भूषण बनसोड,अजय गोंडाणे, दिनेश बूब, अरुण जयस्वाल, सुनीता भेले, नूतन भुजाडे, प्रदीप हिवसे, प्रल्हाद चव्हाण, उपायुक्त विनायक औगड, चंदन पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी शामसुंदर सोनी, नगरसचिव मदन तांबेकर, सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे, आदी उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविकातून शिक्षणाधिकारी अरुणा डांगे यांनी शिक्षण विभागात राबविल्या जात असलेल्या उपक्रमाचा पाढा वाचला. दरम्यान पोद्दार स्कुलचे प्राचार्य सुधीर महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ‘एबीसीडी’ तून भविष्यातील जीवन जगण्याचा मार्ग समजावून सांगितला. यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी पश्चिम त्रिपुराची राजधानी अगरतला येथे महापालिका आयुक्तपदी कार्यरत असताना त्यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांना नुकतेच गौरविण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. महापालिकेत शाखा अभियंतापदी कार्यरत नितीन बोबडे यांनी योगासन स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावल्याबद्दल त्यांचा सत्कार झाला. यावेळी शहरातील २३३ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देवून विद्यार्थी गौरविण्यात आले.
दिगंबर डहाके यांनी स्वीकारले पालकत्व
महापालिका शाळेतून इयत्ता १० वीत गुणवत्ता प्राप्त यादीत धडकणाऱ्या दोन मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारणार अशी घोषणा शिवसेनेचे नेते दिगंबर डाहाके यांनी केले. मुलींच्या शैक्षणिक खर्चासाठी दरवर्षी पाच हजार रुपये शिष्यवृत्ती प्रदान केली जाईल. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करु असे दिगंबर डाहाके म्हणाले.