पीडब्ल्यूडीच्या अभियंत्याची बोळवण

By Admin | Updated: March 15, 2017 00:08 IST2017-03-15T00:08:11+5:302017-03-15T00:08:11+5:30

सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रतिनियुक्तीवर पाठविलेल्या उपविभागीय अधिकाऱ्याला ‘शहर अभियंता’पदावर ....

PWD engineer's speaking | पीडब्ल्यूडीच्या अभियंत्याची बोळवण

पीडब्ल्यूडीच्या अभियंत्याची बोळवण

महापालिका : कार्यकारी अभियंता-२ वर पदस्थापना
अमरावती : सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रतिनियुक्तीवर पाठविलेल्या उपविभागीय अधिकाऱ्याला ‘शहर अभियंता’पदावर रुजू करून न घेता त्यांना कार्यकारी अभियंता २ या पदावर पदस्थापना दिल्याचा प्रकार महापालिकेत उघड झाला आहे. या पदस्थापनेमुळे आगामी काळात यंत्रणेत मोठी खळबळ माजण्याचे संकेत मिळाले आहेत.
नायगाव मुंबई येथील उपविभागीय अधिकारी विजयसिंग गहेरवार यांची २८ फेब्रुवारीच्या शासनादेशाने कार्यकारी अभियंता या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे अमरावती महापालिकेत रिक्त पदावर पदस्थापना होत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने म्हटले आहे. या शासनादेशानुसार गहेरवार यांना महापालिकेत ‘शहर अभियंता’ या पदावर पदस्थापना अपेक्षित होती. महापालिकेत शहर अभियंता हे पद प्रतिनियुक्तीचे आहे, तर दोन्ही कार्यकारी अभियंते महापालिकेच्या आस्थापनेवरचे आहेत. मात्र विद्यमान परिस्थितीत शहर अभियंता पदावर जीवन सदार यांची सेवा कंत्राटी तत्त्वावर घेतली जात असल्याने गहेरवार यांना शहर अभियंता या पदावर रुजू करून न घेता त्यांची कार्यकारी अभियंता २ अर्थात ‘ई-टू’ या पदावर बोळवण करण्यात आली आहे. तूर्तास शहर अभियंता या प्रतिनियुक्तीच्या पदावर सदार हे ९ जून २०१५ पासून कार्यरत आहेत. गहेरवार यांचा शहर अभियंता या पदावर पाठविले असताना त्यांना डावलण्यात आले आहे. त्यासाठी आदेशात कार्यकारी अभियंता असे नमूद असल्याची पळवाट शोधण्यात आली. यापूर्वी पीडब्ल्यूडीने संजय सोनवणे यांना कार्यकारी अभियंता म्हणून महापालिकेत रिक्तपदी नियुक्ती केली होती. मात्र त्यांना रुजू करून घेतल्या गेले नाही. यापूर्वीसुद्धा संजय पवार यांना शहर अभियंता पदावर रुजू करून न घेता तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी त्यांना कार्यकारी अभियंता २ या पदावर रुजू होण्याचे आदेश दिले होते. मात्र पवार हे मवाळ असल्याने त्यांनी त्या अन्यायाविरुद्ध दाद मागितली नाही. मात्र गहेरवार हे अन्याय सहन करणाऱ्यांपैकी नसल्याचे त्यांच्या अनौपचारिक प्रतिक्रियेतून स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)

आयुक्तांचे आदेश
महापालिकेत रिक्त असलेल्या कार्यकारी अभियंता २ (स्थापत्य) या पदावर गहेरवार मध्यान्हपूर्व रुजू करून घेण्यात येत असल्याचा आदेश १० मार्चला आयुक्तांच्या स्वाक्षरीने काढण्यात आला.

शहर अभियंतापद प्रतिनियुक्तीचे
महापालिकेत शहर अभियंता हे पद प्रतिनियुक्तीचे आहे. २०१० ते २०१५ या कालावधीत येथे महापालिकेचे ज्ञानेंद्र मेश्राम कार्यरत होते. त्यानंतर पीडब्ल्यूडीकडून आलेले जे.एस.भानुसे यांनी ९ एप्रिल २०१५ ते १२ मे २०१५ व एस.आर. जाधव यांनी १२ मे २०१५ ते ९ जून २०१५ या कार्यकाळात काम केले. तत्पूर्वी पीडब्ल्यूडीने पाठविलेले अभियंतेच शहर अभियंता या पदावर कार्यरत होते हे येथे विशेष उल्लेखनीय.

शासनादेशान्वये विजयसिंग गहेरवार यांची कार्यकारी अभियंता या रिक्त पदावर पदस्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांना कार्यकारी अभियंता २ या पदावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- हेमंत पवार,
आयुक्त, महापालिका

Web Title: PWD engineer's speaking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.