प्रस्थापितांना धक्का; विद्यमान कारभारी आमने-सामने

By Admin | Updated: October 8, 2016 00:07 IST2016-10-08T00:07:03+5:302016-10-08T00:07:03+5:30

फेब्रुवारी २०१७ ला होणाऱ्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आरक्षण सोडत प्रस्थापितांना धक्का देणारी ठरली आहे.

Pushes to Founders; Existing steward face-to-face | प्रस्थापितांना धक्का; विद्यमान कारभारी आमने-सामने

प्रस्थापितांना धक्का; विद्यमान कारभारी आमने-सामने

महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक : प्रभागरचना जाहीर, युती-आघाडीवर अनेकांचे भवितव्य अवलंबून
अमरावती : फेब्रुवारी २०१७ ला होणाऱ्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आरक्षण सोडत प्रस्थापितांना धक्का देणारी ठरली आहे. प्रभागाच्या सीमारेषा विस्तारल्याने भल्याभल्यांची पंचाईत झाली आहे तर अनेक प्रभागात विद्यमान नगरसेवकांमध्ये ‘टशन’ रंगणार आहे. ही निवडणूक मिनी विधानसभा ठरण्याचे संकेत आहेत. ही निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे. यासाठी प्रभागरचना शुक्रवारी जाहीर करण्यात आली. त्याचबरोबर आरक्षण सोडती काढण्यात आल्यात.
विद्यमान सभागृहात८७ नगरसेवक ४३ प्रभागांचे प्रतिनिधित्व करतात. मात्र, बहुसदस्यीय प्रभागपद्धतीने प्रभागाची संख्या २२ वर स्थिरावली आहे.२१ प्रभागाच्या सीमा नवनिर्मित २२ प्रभागात आकुंचन पावल्या आहेत. लोकसंख्येच्या निकषावर २२ प्रभागांमध्ये सुतगिरणी हा सर्वात मोठा तर एसआरपीफ हा सर्वात लहान प्रभाग आहे. सन २०११ च्या लोकसंख्येच्या आधारे प्रभागरचना करण्यात आली आहे. नव्या प्रभागरचनेचा फटका अनेकांना बसला असला तरी प्रत्येक प्रभागात एक किंवा दोन जागा खुल्या प्रवर्गासाठी असल्याने प्रत्येकाला रिंगणात येणे शक्य झाले आहे. हक्काचा प्रभाग आरक्षित असला तरी त्याच प्रभागात सर्वसाधारण जागेवर लढता येणे शक्य होणार आहे
बबलू शेखावत, चेतन पवार, प्रकाश बनसोड, प्रदीप हिवसे, जयश्री मोरय्या, नंदू वऱ्हाडे, मिलिंद बांबल यांच्यासह अनेकांना एक तर अन्य प्रभागामध्ये लढावे लागेल किंवा अनारक्षित जागेवर दावेदारी ठोकावी लागेल. युती आणि आघाडीवरही विद्यमान नगरसेवकांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी आणि शिवसेना - भाजपामध्ये समेट झाल्यास वेगळे समीकरण पहायला मिळणार आहे, हे विशेष!

तासाभरात शमली आरक्षणाची उत्सुकता
महापालिका निवडणूक : राजकीय समीकरणांना वेग
अमरावती : फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने शुक्रवार ७ आॅक्टोबरला आरक्षण सोडत काढण्यात आली. सकाळी ११.०५ मिनिटांनी सुरु झालेली ही प्रक्रिया अवघ्या तासाभरात संपुष्टात आल्याने दीड महिन्यांपासून लागून राहिलेली आरक्षणाची उत्सुकताही शमली. काहींच्या चेहऱ्यावर हसू फुलले, तर काहींचे चेहरे नैराश्याने झाकोळून गेले. याचवेळी प्रभागरचनेचे प्रारूपही प्रसिद्ध करण्यात आले. टाऊन हॉलमध्ये प्रभागरचनेचे नकाशे लावण्यात आल्याने समस्त इच्छुकांनी प्रभागरचना जाणून घेतली.
टाऊन हॉलमध्ये शुक्रवारी सकाळी ११ वाजता नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती आणि सर्वसाधारण महिलांसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. आयुक्त हेमंत पवार यांच्या नेतृत्वात आरक्षणाच्या सोडती काढण्यात आल्यात. महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक चार सदस्यीय प्रभागपद्धतीने होत असल्याने नव्या प्रभागरचनेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शुक्रवारी आरक्षणासोबतच प्रभागरचना जाहीर झाल्याने राजकीय समीकरणांना वेग येणार आहे.
महापालिका निवडणुकीत ४३ प्रभागांऐवजी २२ प्रभाग राहतील. यातील २१ प्रभागातून प्रत्येकी चार आणि एसआरपीएफ प्रभागातून तीन असे एकूण ८७ नगरसेवक निवडून येतील. ही निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार असल्याने अनेकांची समीकरणे बिघडली आहेत. २२ प्रभागांच्या सीमारेषा स्पष्ट झाल्याने वातावरण ढवळून निघणार आहे. बहुसदस्यीय प्रभागामध्ये कुठला प्रभाग सुरक्षित राहील, याची चाचपणी सुरू झाली आहे. आयुक्त हेमंत पवार, उपायुक्त विनायक औगड, नरेंद्र वानखडे, सहायक निवडणूक अधिकारी मदन तांबेकर, सहायक आयुक्त महेश देशमुख, योगेश पिठे, निवेदिता घार्गे, सोनाली यादव, निरीक्षक दुर्गादास मिसाळ आदींनी ही क्लिष्ट प्रक्रिया तासाभरात पार पाडली.
८७ सदस्यीय सभागृहात १५ जागा अनुसूचित जातीसाठी, २ जागा अनुसूचित जमातींसाठी आणि २३ जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव आहेत, तर सर्वसाधारण ४७ जागा आहेत. यात ५० टक्के महिला आरक्षण आहे.
ज्या २१ प्रभागात चार सदस्य आहेत तेथील जागांना अ, ब, क, ड असे संबोधण्यात येणार आहे. याशिवाय एसआरपीएफ प्रभागात तीन सदस्य राहणार आहेत. ८७ जागांपैकी १५ जागा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने सर्वप्रथम त्यातील आठ जागांवरील महिलांचे आरक्षण काढण्यात आले. त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिलांसाठीचे आरक्षण काढण्यात आले. आरक्षण सोडत निश्चित झाल्यानंतर लगेच त्याची एन्ट्री संगणकावर घेतल्याने ते आरक्षण स्क्रिनवर सार्वजनिक करण्यात आले. त्यामुळे नगरसेवक असो वा इच्छुक प्रत्येकाला त्याच्या मोबाईलवर संपूर्ण आरक्षण सोडत आणि प्रभागाचे स्वरूप पाहता आले.

२५ आॅक्टोबरपर्यंत हरकती
७ आॅक्टोबरला आरक्षणासह प्रभागरचनेचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात आले. यानंतर १० आॅक्टोबरला प्रारूप प्रभागरचनेची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध होईल. १० ते २५ आॅक्टोबर या कालावधीत प्रारूप प्रभागरचनेवर हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. त्यानंतर राज्य निवडणूक आयुक्त अथवा त्यांनी प्रधिकृत केलेला अधिकारी प्रारूप प्रभागरचनेवर प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी देतील.

शेखावत, बनसोड, पवारांना फटका
मनपा सभागृह नेते बबलू शेखावत यांचा एसआरपीएफ हा प्रभाग तीन सदस्यीय झाला आहे. त्यातील ‘अ’ ही जागा एससी, ‘ब’ एसटी महिला आणि तिसरी जागा खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाली आहे. त्यामुळे शेखावताना अन्य प्रभागातून लढावे लागणार आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटचे गटनेते चेतन पवार यांचा अंबिकानगर हा प्रभाग रूख्मिणीनगर, फ्रेजरपुरा आणि राजापेठ या तीन प्रभागांमध्ये विभाजित झाला आहे. त्यांना आता राजापेठ प्रभागातून लढावे लागेल. याशिवाय या भागातील आशा निंदाणे, प्रदीप हिवसे ,जयश्री मोरय्या यांना राजापेठ प्रभागातून रिंगणात उतरावे लागेल. त्यामुळे राजापेठ या विद्यमान प्रभागामध्ये विद्यमान नगरसेगवक परस्परांसमोर उभे ठाकण्याचे संकेत आहेत. प्रकाश बनसोड यांना या प्रभागातील एससी जागा महिलांसाठी राखीव झाल्याने आता ओपनमधून लढावे लागेल.

नवख्यांसोबत विद्यमान नगरसेवकांची लढत
शेगाव रहाटगाव ,पीडीएमसी आणि नवसारी या तीन प्रभागांसह अन्य अनेक प्रभागांमध्ये बहुतांश विद्यमान नगरसेवक एकमेकांविरूद्ध लढणार आहेत. त्यामुळे या लढती सर्वच पक्षांसाठी निर्णायक ठरतील. अनेकांचे प्रभाग नव्या रचनेत गुडूप झाल्याने निवडणूक लढायची कोठून, असा सवालही अनेकांसमोर उभा ठाकला आहे.

बुधवाऱ्यात इंगोले-हरमकरांचा सामना ?
बुधवारा प्रभागामध्ये ‘अ’ जागा इतर मागासवार्गियांसाठी, ब आणि क या दोन जागा सर्वसाधारण महिलांसाठी आणि चौथी जागा खुल्या प्रवर्गासाठी आहे. त्यामुळे येथे विद्यमान नगरसेवक विलास इंगोले आणि विरोधी पक्षनेता प्रवीण हरमकर समोरासमोर उभे ठाकण्याचे संकेत आहेत. येथे इच्छुकांची मोठी गर्दी असल्याने ही लढत ‘हेवीवेट’ ठरणार आहे.

Web Title: Pushes to Founders; Existing steward face-to-face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.