अवैध वाळूला पायबंद घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 22:11 IST2018-02-16T22:11:18+5:302018-02-16T22:11:52+5:30
यवतमाळ जिल्ह्यातील वाळूघाटातून अवैध व ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी यवतमाळ व अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

अवैध वाळूला पायबंद घाला
आॅनलाईन लोकमत
अमरावती : यवतमाळ जिल्ह्यातील वाळूघाटातून अवैध व ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी यवतमाळ व अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले. आ. वीरेंद्र जगताप यांच्या उपस्थितीत शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयात या विषयात बैठक झाली.
जिल्ह्यात यवतमाळ जिल्ह्यातील वाळूघाटातून सर्रास सूर्योदय ते सूर्यास्त वगळून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणार अवैध व ओव्हरलोड वाळूची वाहतूक होत आहे. ही सर्व वाहतूक धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे या तालुक्यांतून होत आहे. अवैध वाळू वाहतुकीमुळे रस्तेही खराब होण्याची प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर आ. जगताप यांनी बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार अवैध व ओव्हेरलोड वाळू वाहतुकीला पायबंद घालण्यासाठी विभागीय आयुक्त यांच्याकडे अमरावती व यवतमाळ जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, खनिकर्म अधिकारी, तहसीलदार यांची संयुक्त बैठक १६ फेब्रुवारी रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली. या बैठकीत सध्या जिल्ह्यात यवतमाळ जिल्ह्यातील वाळूघाटातून सूर्योदय ते सूर्यास्त ही वेळ सोडून रात्रीच्या दरम्यान अवैध व ठरवून दिलेल्या भारमानापेक्षा अधिक वाळूची वाहतूक होत आहे. त्यामुळे रस्त्याचीही बिकट अवस्था झाली आहे. लिलावातून विक्री करण्यात आलेल्या वाळूघाटात रात्रीदरम्यान जेसीबीच्या साहाय्याने उत्खनन करताना ठरवून दिलेल्या मापदंडापेक्षा अधिक उपसा केला जात आहे. याशिवाय एकाच रॉयल्टीवर तीन ते चार वेळा वाळूची, तेही क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक होत आहे. त्यामुळे सूर्यास्तानंतर होणारी अवैध व ओव्हरलोड वाहतूक पूर्णत: बंद करण्याची मागणी आ. जगताप यांनी बैठकीत केली. त्यानुसार वरील प्रकारे नियमबाह्य व अवैध प्रकारे वाळू वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश आयुक्त पीयूष सिंह सिंह यांनी जिल्हाधिकारी व पोलिस प्रशासनाला दिले आहेत. याशिवाय या प्रकाराला आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी महसूल विभागाला दिले आहेत. बैठकीला विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी स्नेहल कनिचे, तहसीलदार नांदगाव मनोज लोणारकर, चांदूर रेल्वेचे तहसीलदार राजगडकर, धामणगाव तहसीलदार डोईफोडे आदी उपस्थित होते.
पाच ठिकाणी चेकपोस्ट, संयुक्त पाहणी होणार
यवतमाळ जिल्ह्यातील वाळूघाटाची अमरावती व यवतमाळ येथील महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार संयुक्त पाहणी करणार आहेत. यानंतर यासंदर्भातील अहवाल विभागीय आयुक्ताकडे सादर केला जाणार आहे. याशिवाय पाच ठिकाणी चेकपोस्ट लावले जाणार आहेत. यात महसूल व पोलीस अधिकारी-कर्मचाºयांचा समावेश राहणार आहे. धामणगाव रेल्वे ३, चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर या ठिकाणी प्रत्येकी १ चेकपोस्ट लावले जाणार आहेत. यासोबतच भरारी पथकात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश करण्याचा निर्णय बैठकीत झाला.