वाळू माफियांनी खोदून काढले पूर्णा नदीचे पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:12 IST2021-03-20T04:12:31+5:302021-03-20T04:12:31+5:30
फोटो पी १९ परतवाडा फोल्डर खोदकामाचे नियम धाब्यावर, कारवाई कुणावर? नरेंद्र जावरे परतवाडा : भातकुली तालुक्यातील पोहरा येथील लिलाव ...

वाळू माफियांनी खोदून काढले पूर्णा नदीचे पात्र
फोटो पी १९ परतवाडा फोल्डर
खोदकामाचे नियम धाब्यावर, कारवाई कुणावर?
नरेंद्र जावरे
परतवाडा : भातकुली तालुक्यातील पोहरा येथील लिलाव झालेल्या वाळू घाटातील रेतीची उचल न करता इतर ठिकाणाहून रेती चोरली जात असल्याचा प्रकार उघड होताच महसूल विभागाची झोप उडाली. दुसरीकडे नियम धाब्यावर बसवून रेतीघाट मालकांसह चोरांनी पूर्णा नदीच्या पात्रात तीन फुटांपेक्षा अधिक खोदकाम केल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे. पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दोन वर्षांपासून जिल्ह्यात सर्वत्र रेतीबाबत ओरड आहे. भातकुली, धामणगाव रेल्वे ते दर्यापूर, तिवसा येथील एकूण नऊ रेतीघाटांचा लिलाव करण्यात आला आहे. त्यात पोहरा पूर्णा येथील रेतीघाटाचा लिलाव १ कोटी १२ लक्ष रुपयांपेक्षा अधिक दराने झाला. त्या मोबदल्यात ३,९७५ ब्रास रेती उचलण्याची परवानगी घाट मालकाला देण्यात आली. त्यासाठी नियम व अटी लागू करण्यात आल्या. प्रत्यक्षात मात्र सर्व नियम व अटी धाब्यावर बसवून बेछुटपणे वाटेल तेथून नदीपात्राची चाळण केली जात असल्याचे गंभीर चित्र आहे. परंतु, महसूल विभाग पाहिजे त्या प्रमाणात गंभीर नसल्याचे वास्तव आहे. दोन ब्रास ऐवजी ट्रकमध्ये तीन ब्रासपेक्षा अधिक रेती नेली जात आहे.
बॉक्स
पूर्णा नदी पात्रात नियमाची ऐशीतैशी
भातकुली तालुक्यातील पोहरा येथील परवानगी असताना, रेती तस्करांनी अचलपूर तालुक्याच्या येलकी पूर्णा परिसरातून रेती चोरीचा सपाटा लावला आहे. अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. जिल्हा प्रशासनाला एका तक्रारीनंतर जाग आली. महसूल प्रशासन पहाटे ५ वाजतापासून घटनास्थळी गेल्यावर वाळूने भरलेले पाच ट्रक पकडण्यात आले. घटनास्थळी १० ते २० फुटांपेक्षा अधिक खोल खड्डे रेती चोरांनी केल्याचे चित्र आहे. नियमावली धाब्यावर बसविण्यात आली आहे.
बॉक्स
पाच ट्रक मालकांना कारणे दाखवा
अचलपूर महसूल विभागाच्या पथकाने चार दिवसांपूर्वी येलकी पूर्णा परिसरात पूर्णा नदी पात्रातून पाच ट्रकवर कारवाई केली. या सर्व ट्रक मालकांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी गुरुवारची वेळ देण्यात आली होती. परंतु त्यांनी आपले म्हणणे मांडले नाही. त्यामुळे पुन्हा सोमवारपर्यंत वेळ देण्यात आली आहे. प्रत्यक्षात त्यांना अजूनपर्यंत दंड ठोठावण्यात आलेला नाही.
कोट
पोहरा पूर्णा येथील पूर्णा नदीच्या पात्रात अर्धा मीटर जमिनीपासून खोदकामाची परवानगी देण्यात आली आहे.
- सुनील रामटेके,
जिल्हा खनिकर्म अधिकारी, अमरावती
कोट २
येलकी पूर्णा नदीपात्रातून रेती चोरून नेणाऱ्या पाच ट्रक मालकांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी सोमवारपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर दंड किंवा इतर कारवाई करण्यात येईल.
- मदन जाधव,
तहसीलदार अचलपूर
पान २ ची लिड