पूर्णा प्रकल्पाची उदासीनता जिवावर बेतली
By Admin | Updated: February 28, 2015 00:40 IST2015-02-28T00:40:48+5:302015-02-28T00:40:48+5:30
मागील दोन वर्षांपासून कालव्याचे पाणी शेतात साचत असल्यामुळे अर्ध्याअधिक शेतातील पिकांचे नुकसान झाले. प्रकल्प अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतरही

पूर्णा प्रकल्पाची उदासीनता जिवावर बेतली
सुरेश सवळे चांदूरबाजार
मागील दोन वर्षांपासून कालव्याचे पाणी शेतात साचत असल्यामुळे अर्ध्याअधिक शेतातील पिकांचे नुकसान झाले. प्रकल्प अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतरही पूर्णा मध्यम प्रकल्प उपविभाग क्रमांक ४ च्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेतकरी कुटुंबातील मुलाने आत्महत्या केली. या आत्महत्येला प्रकल्प उपविभागातील अधिकारी व कर्मचारी जबाबदार असून त्यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्याची तक्रार मृताच्या भावाने पोलिसात केली आहे.
नानोरी येथील शेतकरी विठ्ठलराव धर्माळे यांचे बोरज शिवारात गट नंबर ७२/१ मध्ये ६८ आर शेत आहे. या जिरायती शेतातील उत्पन्नाच्या भरवशावर विठ्ठलराव त्यांच्या कुटुंबाची उपजिविका भागविते. शेताच्या मध्यभागातून विश्रोळी येथे पूर्णा प्रकल्पाचे रेल क्रमांक १२ च्या कालव्याची मुख्य १२ इंच व्यासाची पाईपलाईन गेली आहे. ही पाईप लाईन दोन वर्षांपासून फुटल्यामुळे संपूर्ण शेतात पाण्याचा प्रवाह सुरू झाला आहे. त्यामुळे अर्ध्याअधिक शेतात पाणी साचले आहे. या बाबीची तक्रार दोन वर्षांपासून धर्माळे कुटुंब पूर्णा मध्यम प्रकल्प उपविभाग क्रमांक ४ च्या अधिकाऱ्यांकडे करीत आहे. शेतात पाणी साचण्याचे प्रमाण वाढल्यामुळे दोन वर्षांपासून अर्ध्याअधिक शेतातील पिकांचे नुकसान होत असून पेरलेले पिकही हाती लागत नाही. ही बाबसुद्धा तक्रारीच्या माध्यमातून पूर्णा प्रकल्प अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
सध्या शेतात हरभऱ्याचे पीक आहे. या साचलेल्या पाण्यामुळे हरभऱ्याचे पीक सडत असल्याचे पाहून २५ फेब्रुवारी रोजी आशिष धर्माळे हा संबंधित अधिकाऱ्याकडे गेला व लिकेज पाईप लाईन जोडण्याची विनंती केली. परंतु तेथील उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आशिषला शिवीगाळ करून हाकलून लावल्याचे त्याने आईला सांगितले. इतकेच नव्हे तर आशिषने विषारी औषध प्राशन केले ही बाब आईच्या लक्षात आल्यावर शेजारी नागरिकांच्या मदतीने त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
आशिषच्या आत्महत्येला जलसंपदा विभागाच्या पूर्णा प्रकल्प उपविभाग क्र. ४ चांदूरबाजार येथील अधिकारी व कर्मचारीच जबाबदार असल्याचा आरोप मृताचा भाऊ भूजंग धर्माळे यांनी केला आहे. पोलिसात व तहसीलदाराकडे या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास करीत आहे.