शेकडो गावांची तहान भागविणारी ‘पूर्णा माय’ कोरडीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 23:31 IST2017-08-10T23:30:29+5:302017-08-10T23:31:48+5:30

तालुक्यातील पूर्णा धरणाची पातळी दहा वर्षानंतर पहिल्यांदाच अल्प पावसामुळे खालावली आहे.

'Purna My' drying away hundreds of villages, dry | शेकडो गावांची तहान भागविणारी ‘पूर्णा माय’ कोरडीच

शेकडो गावांची तहान भागविणारी ‘पूर्णा माय’ कोरडीच

ठळक मुद्देजलसंकट : २७ टक्केच जलसाठा शिल्लक, दिवसाआड पाणी

सुमीत हरकुट
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूरबाजार : तालुक्यातील पूर्णा धरणाची पातळी दहा वर्षानंतर पहिल्यांदाच अल्प पावसामुळे खालावली आहे. धरणात ७ आॅगस्टपर्यंत अल्प जलसाठा उपलब्ध असल्याने आगामी काळात तालुक्यातील जलसमस्या गंभीर होणार आहे. शेकडो गावांची तहान भागवणारी पूर्णामाय पहिल्यांदाच कोरडी पडल्याची स्थिती आहे.
जिल्ह्यातील १०७ गावांची तहान भागविण्याकरिता सातपुड्याच्या पायथ्याशी विश्रोळी गावाजवळ पूर्णा नदीवर प्रकल्प उभारण्यात आला आहे. याप्रकल्पात सध्या ९.६२३१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. या पाणीसाठ्याची टक्केवारी २७.२१ टक्के इतकी आहे. यामुळे कालव्याद्वारे शेतीला पाणी पुरवणे बंद करण्यात आले आहे तर चांदूरबाजार व भातकुली तालुक्यातील १०७ गावांना याधरणाचा पिण्याकरिता पाणीपुरवठा करण्यात येतो. दररोज यागावांना १९ दशलक्ष लीटर प्रतिदिवस शुद्धीकरण करून पाणीपुरवठा करण्यात येतो तर ५४०० हेक्टर शेतीला सुद्धा पाणी पुरविण्यात येत होते. धरणात मागीलवर्षी आजपर्यंत २१.८८५२ द.ल.घ.मी. म्हणजेच ६१.८८ टक्के जलसाठा उपलब्ध होता. त्यातुलनेत यावर्षी अल्प पावसामुळे हा जलसाठा अतिशय कमी असल्याने यावर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ शकते. मागीलवर्षी २ नोव्हेंबर रोजी धरणात ९४.६८ टक्के जलसाठा उपलब्ध होता. त्यामुळे धरणातून कालव्याच्या मार्गे हजारो हेक्टर शेतीला पाणी पुरविणे शक्य झाले होते. मात्र, यावर्षी पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही धरणात पाणी गोळा झालेले नाही. त्यामुळे यावर्षी नागरिकांनी पाणी जपून वापरावे म्हणजे पेयजलाची टंचाई भासणार नाही. यंदा धरणाचे दरवाजे एकदाही उघडण्यात आले नसल्याची माहिती पूर्णा प्रकल्पाचे उपअभियंता अक्षय इरजकर यांनी दिली.
जलसंकट : २७ टक्केच जलसाठा शिल्लक, दिवसाआड पाणी
पाण्याची काटकसर गरजेची

सद्यस्थितीत धरणात अल्प जलसाठा उपलब्ध असून विसर्ग करणाºया गेटवर फक्त १४ सें.मी. इतके पाणी आहे. या धरणातून चांदूरबाजार शहरात एक दिवसीआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. मात्र,पुढेही पाऊस न पडल्यास पाण्यासाठी परिसरात हाहाकार माजू शकतो. त्यामुळे नागरिकांनी आजच पाण्याचा योग्य वापर करणे गरजेचे झाले आहे.
तीर्थ विसर्जनासाठीही नाही पाणी
आसेगाव पूर्णा : पूर्णानदीच्या काठावर अनेक गावे आहेत. या गावांमध्ये सणानिमित्त पूर्णानदीत तीर्थ विर्सजन करण्याची प्रथा आहे. मात्र, यंदा अत्यल्प पावसामुळे पूर्णा नदीपात्रात पाणी नसल्याने नळाच्या पाण्याने नदीत तीर्थ विसर्जन करण्याची वेळ नागरिकांवर आली. नागपंचमीच्या दिवशी नागरिकांनी नळाचे पाणी पाईपच्या सहाय्याने नदीपर्यंत आणून नागपंचमीचे सोपस्कार पूर्ण केले. यावेळी देवाकडे पाण्यासाठी साकडे घालण्यात आले.

Web Title: 'Purna My' drying away hundreds of villages, dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.